मुंबई : मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा पाच मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी शनिवार संपून रविवार सुरू होताना मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या सीएसएमटीच्या दिशेकडील ५ मीटर रुंद पादचारी पुलाचे चार गर्डर लाँच करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तो मुलुंड ते कळवा डाऊन धिम्या मार्गिकेवर असेल. मध्यरात्री १२:३० ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटण्याऱ्या डाऊन लोकल मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या ठाणे, कळवा आणि मुंब्रा स्थानकात जलद मार्गावर थांबतील.
सीएसएमटी-टिटवाळा शेवटची लोकल कधी? ब्लॉकच्या आधी शेवटची सीएसएमटी टिटवाळा लोकल सीएसएमटी येथून रात्री ११:१६ वाजता सुटेल आणि टिटवाळ्याला मध्यरात्री ०१:०० वाजता पोहोचेल, तर ब्लॉकनंतरची पहिली सीएसएमटी - टिटवाळा लोकल विद्याविहार येथून ०५:११ वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे ०६:२३ वाजता पोहोचेल.