लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाच्या कारकुनी कारभारामुळे शहरविकास ठप्प झाला आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. शहरातील कचऱ्याची समस्या ‘जैसे थे’ असून नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे. अर्धवट असलेला अंबरनाथ-कल्याण रस्ता, मुख्य पाच रस्त्यांची कामे ठप्प झाली आहेत. मनपा पाणी, कचरा उचलण्याचे बिल व कर्मचाऱ्यांचा पगार ही तीनच कामे करत असल्याचा आरोप केला.उल्हासनगर महापालिकेवर भाजप मित्र पक्षाची आघाडी सत्तेवर आली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यात एकाही विकासकामाला सुरूवात झाली नसून पदासाठी त्यांच्यात भांडणे लागली आहेत. तोच प्रकार महापालिका प्रशासनाचा असून कारकुनी कारभाराचा प्रत्यय येत असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. एलबीटी बंद झाल्यानंतर पालिकेने कोणतेही नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केलेले नाहीत. नगररचनाकार विभागाकडून येणाऱ्या उत्पन्नाला ब्रेक लागला असून आयुक्त नगररचनाकार विभागाबाबात ठोस भूमिका घेत नाही. सत्ताधारी भाजपाने नवीन नगररचनाकार आणून ठप्प पडलेला विभाग सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.भाजपा मित्र पक्षाच्या आघाडीपूर्वी महापालिकेवर शिवसेना-भाजपा, साई व रिपाइची सत्ता होती. मात्र सरकारने जकात व एलबीटी बंद करून त्याऐवजी ११ कोटीचे अनुदान सुरू केले. जकातीपासून पालिकेला दरमहा १३ कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते. सरकारने त्या उत्पन्नाच्या प्रमाणात एलबीटी अनुदानाची मागणी सत्ताधारी भाजपाने सरकार दरबारी लावून धरण्याचा आग्रह शिवसेनेने धरला आहे. पालिका पाणीबिल व कचरा उचलण्याच्या बिलासह कर्मचाऱ्यांचा पगार असे तीनच कामे करत आहेत. एलबीटी पोटीचे अनुदान व मालमत्ता कर वसुली असे दोनच उत्पन्नाचे स्त्रोत पालिकेकडे आहेत. निधीचे कारण पुढे केल्याने शहरातील विकासकामे ठप्प पडली आहेत.
सत्ताधाऱ्यांची कारकुनी; झाला विकास ठप्प
By admin | Published: June 21, 2017 4:33 AM