डोंबिवली : पूर्वेतील एमआयडीसीतील निवासी भागात तीन दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार घडत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
एमआयडीसीत रविवारी रात्री १० ते १२ दरम्यान वीज गायब झाली. त्यामुळे नागरिकांनी रात्री महावितरण कार्यालयावर जाऊन विचारणा केली. पण तेथे कोणीही जबाबदार कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली. तसेच सोमवरी सकाळीही वीज जात येत असल्याने विद्यार्थी, होम वर्क करणारे नोकरदार यांनाही त्रास सहन करावा लागला. त्यात उष्णता वाढत असल्याने त्याचाही फटका नागरिकांना बसत असल्याने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितेश ढोकणे यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले की, त्या भागात वीज वाहिन्यांच्या शिफ्टिंगचे काम होत असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ही कामे दोन ते तीन दिवसांत पूर्ण झाल्यावर वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल. त्यानंतर समस्या निकाली निघेल.
दरम्यान, ठाकुर्ली बाजारपेठ परिसरात सकाळी ६.३०च्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. साधारण अर्धा-पाऊण तासाने तो सुरळीत झाला. त्यानंतर पुन्हा सकाळी ११ वाजता खंडित झालेली वीज साधारण दुपारी २ च्या सुमारास पूर्ववत झाली.
-------------