डोंबिवली : वीज बिल भरण्यात राज्यात अग्रेसर असलेल्या डोंबिवली शहरात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, त्याचा फटका वर्क फ्रॉम होम करणारे नोकरदार व ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना बसत आहे. एमआयडीसी परिसरातील घरडा सर्कल येथील महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीत शुक्रवारीही तांत्रिक बिघाड झाल्याने २५ हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
शहरात सोमवारपासून विविध ठिकाणी विजेची समस्या भेडसावत आहे, तर शुक्रवारी रामनगर, गणेश मंदिर, राजाजी पथ, फडके रोड, मानपाडा रस्त्याचा काही भाग, शिवमंदिर रोडवरील काही भाग, टंडन रोडवरील वीज ग्राहकांना त्याचा फटका बसला. सकाळपासून दोन-तीन वेळा वीज खंडित झाली, त्यानंतर ११.३० वाजेपासून वीज दोन तास खंडित झाली होती, तसेच पश्चिमेतील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घरडा सर्कलजवळ मुख्य वाहिनीचा इनकमर फेल झाला होता. मात्र, बिघाड नेमका काय व कुठे होता, हे शोधण्यात वेळ गेल्याने २५ हजार ग्राहकांना त्याचा फटका बसला. अखेर दुपारी १२.३० च्या सुमारास बिघाड लक्षात आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
---------------