लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील म्हात्रेनगर परिसरात पंधरवड्यापासून विजेचा लपंडाव सुरू असून, सुमारे दहा हजार नागरिक त्रस्त आहेत. सोमवारी रात्री ८ नंतर मध्यरात्रीपर्यंत पाच तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर उतरून दुरुस्तीची मागणी केली.
याबाबत माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर म्हणाले की, म्हात्रेनगरमध्ये वीजसमस्या उद्भवू नये, यासाठी महावितरणकडे चार महिन्यापासून देखभाल-दुरुस्तीची मागणी करीत आहे. मात्र, त्याकडे महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात विजेची समस्या निर्माण होत आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनी राज्यमंत्री असताना या भागात रिंगरुट अशी विजेची योजना केली होती, मात्र त्याचे नंतर काय झाले, हे समजत नाही. त्यामुळे समस्या वाढली असून, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे, वीजसमस्येचा फटका या प्रभागातील कोविड लसीकरण केंद्रालाही बसत आहे. त्यामुळे ही समस्या निकाली काढण्यासाठी महावितरणने प्राधान्य द्यायला हवे. याची दखल न घेतल्यास ऊर्जामंत्री कार्यालयाकडे तक्रार करणार आहे.
याबाबत डोंबिवली महावितरणचे सहकार्यकारी अभियंता म्हणाले की, सोमवारी क्रो फॉल झाल्याने मुख्य वीजवाहिनीत समस्या आल्याने वेळ लागला. पेडणेकर जे सांगत आहेत त्यानुसार दुरुस्ती-देखभाल करण्यात येईल. आधीपासून आमची सर्व कामे सुरू आहेत, पावसाळ्यात जम्परची समस्या येते, ती आल्याने काही काळ विजेची समस्या येत असण्याची शक्यता आहे.
----------------