लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : ऐन गणेशोत्सवात शहरातील एमआयडीसीतील निवासी विभाग आणि सागाव परिसरातील वीजपुरवठा खंडित होत असल्याने तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. डोंबिवलीतून महावितरणकडे १०० टक्के वीजबिल भरणा होत आहे. असे असतानाही विजेअभावी राहण्याची शिक्षा आम्हाला का?, असा संतप्त सवाल करत रहिवाशांनी शुक्रवारी प्रातिनिधिक स्वरूपात महावितरणचा निषेध व्यक्त केला.
श्री गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी, ११ सप्टेंबरला दिवसभर अधूनमधून वीज येत जात होती. त्यानंतर, गुरुवारी, १६ सप्टेंबरला संपूर्ण निवासी भागात सकाळी ७.३० वाजता गेलेली वीज दुपारी १ वाजता आली. सलग सहा ते साडेसहा तास वीजपुरवठा बंद राहिल्याने त्याचा फटका पाणीपुरवठा, ऑनलाइन शिक्षण, वर्क फ्रॉम होम आदीला बसतो. परंतु, वीजपुरवठा बंद होण्याची कारणे महावितरणकडून योग्य पद्धतीने सांगितली जात नाहीत, असे रहिवाशांनी सांगितले. मोबाइल क्रमाकांवर संपर्क साधल्यावर येथील महावितरणाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे समजते. काहींनी कल्याण येथील तेजश्री बिल्डिंग मुख्य कार्यालयातील अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांचीही बदली झाल्याचे समजले. काहींनी आपल्या पक्षांच्या राजकीय पुढाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडून आश्वासने मिळवली, पण काही उपयोग झाला नसल्याची खंत रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आम्ही व इतरांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याच विषयावर भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी, आम्हाला भविष्यात वीजपुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी, कसे नियोजन आणि इतर तयारी करणार आहोत, अशा आश्वासनांची यादी देऊन आम्हाला खूश करून पाठविले होते. परंतु आता त्यातील बहुतेक जणांची बदली झाल्याने सगळे नियोजन कागदावरच राहिले आहे. त्यामुळे समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल त्यांनी केला.
------
सबडिव्हिजन ३ मध्ये दोन दिवस तांत्रिक अडथळे आले होते. इनकमरमध्ये जम्पर व अन्य समस्या होत्या. त्यात काही तास त्या भागातील नागरिकांना वीजखंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. मी स्वतः घटनास्थळी जाऊन समस्येची तीव्रता जाणून घेत उपाययोजना करवून घेतल्या होत्या.
- नरेंद्र धवड, कार्यकारी अभियंता, महावितरण
-------------