ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वीजबिल थकल्याने गुरुवारी सकाळी १० वाजता महावितरणने रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. तासभर वीज पुरवठ्याअभावी मनोरुग्णांना गैरसोय करावी लागली.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात गुरुवारी एक तास बत्ती गुल झाली होती. रुग्णालयाचे तब्बल २९ लाख रुपये वीज बिल थकल्याने पुरवठा खंडित करण्यात आला होता. मनोरुग्णालय प्रशासनाने महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे केल्यानंतर एक तासाने वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
-------------
सध्या सरकारकडून अनुदान नसल्याने वीज बिल थकले होते. सात दिवसांत ही थकबाकी भरून काढली जाईल.
- संजय बोदाडे, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय
------------------------
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वीज बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज बिल भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर तो पूर्ववत करण्यात आला आहे.
- अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता, ठाणे नागरी मंडळ, महावितरण
.............
भाजप सेनेत रस्सीखेच
मनोरुग्णालयाचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्त्वात पक्षाने मेणबत्त्या पेटवून आंदोलन केल्यामुळेच मनोरुग्णालयाचा वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावल्यानंतरच पुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.