‘शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचं स्वप्न साकारण्याचे सामर्थ्य भारताच्या संविधानात आहे’ प्रा. सुभाष वारे
ठाणे : ‘संविधानाने भारतातील सर्व जाती धर्माच्या स्त्री पुरूषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपलं संविधान ही एक रक्त न सांडता झालेली क्रांती आहे कारण आपल्या संविधानाने 21 वर्षांवरील सर्व स्त्री पुरूषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रीयांना सुद्धा किती वर्ष लढा द्यावा लागला होता. आपल्या देशातील प्रश्न हे संविधांनातील कमतरतेमुळे नाहीत तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत.’ असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रगणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले.
समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ‘सावित्रीबाईफुलेव्याख्यानमालिके’ मध्ये कोपरी संघर्ष समितीच्या सहयोगाने आयोजित कोपरी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ’संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरंच काही आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील याचे उत्तरही संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे. संविधनाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे म्हणून गरीब खुश आहेत, आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही म्हणून श्रीमंत खुश आहेत. संविधानाचे महत्व पटवून घ्यायचे असेल तर संविधान नव्हतं तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी,धर्मवादी, व्यक्तीस्वातंत्र्यविरोधी कायदे होते ते आधी समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाईंना शिक्षण घेण्यास आणि देण्यास प्रखर विरोध झाला कारण त्या वेळेच्या धर्मांच्या कायद्यानुसार स्त्रियांनी आणि शुद्रांनी शिक्षण घेणं हे पाप समजलं जात होतं. संविधानाने सर्व जातीधर्माच्या स्त्री पुरूषांना शिक्षणाचा अधिकार दिला,रोजगार मिळवण्याचा आणि जगण्यासाठी साधने मिळवण्याचा अधिकार दिला. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही, ती हमी फक्त नागरिकांची सामुहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून संविधान अभ्यासून, समजुन घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी नाही आहे तर घरासाठीही संविधान लागू आहे.’
या वेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संगितले की,’ आज समाजात जाती व्यवस्थेमुळे आणि धर्म व्यवस्थेमुळे जी उथळ–पुथळ होते आहे ती संविधांनाबद्दलच्या गैरसमजाने होते आहे. संविधान नीट समजून घेणं ही आजची गरज आहे.’ या प्रसंगी‘समता विचार प्रसारक संस्थे’चे अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ आपले विचार व्यक्त करताना म्हणाले कि,’आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे.’ संस्थेचे सह खजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना केली तर कोपरी संघर्ष समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलेल्या श्रोत्यांमधे समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया,उमाकांत पावसकर, मतदाता जागरण अभियानचे मंगेश खातू, डॉ. चेतना दिक्षीत, अविनाश आणि सुनीती मोकाशी, कोपरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि त्या भागातील नागरिक उपस्थित होते.