लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : वसईतील अमाफ ग्लास टफ कंपनीने मागील ५० महिन्यांत सहा कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा प्रकार भरारी पथकाच्या छाप्यात उघडकीस आला आहे. वीज मीटरवरील वीज वापराची नोंद रिमोटद्वारे ९० टक्क्यांपर्यंत नियंत्रित करून वीजचोरी झाल्याचे निदर्शनाला आले आहे. त्यामुळे कारखान्याचे दोन भागीदार, जागामालक आणि वीज चोरीची यंत्रणा उभारून देणारा एकजण अशा चौघांविरोधात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कामण गाव परिसरातील अमाफ ग्लास टफ कंपनीचे भागीदार व सध्याचे वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर आसिर हुजेफा, जागामालक प्रफुल्ल लोखंडे व वीजचोरीची यंत्रणा बसवून देणारी अनोळखी व्यक्ती अशा चौघांचा समावेश आहे. महावितरणच्या भरारी पथकाला तपासणीत संबंधित ग्राहकाचा जोडलेला वीजभार ६७४ किलोवॅट आढळला. अधिक तपासणीत हकीमुद्दीन कुतुबुद्दीन उनवाला याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडे रिमोट आढळला. त्या रिमोटद्वारे कारखान्याच्या वीज वापरात ९० टक्के घट होत असल्याचे पंचासमक्ष केलेल्या प्रात्यक्षिकात आढळले, असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विजयसिंह दुधभाते यांनी सांगितले.
सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक कमांडर शिवाजी इंदलकर, उपसंचालक सुमित कुमार, मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपसंचालक सतीश कापडणी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक पानतावणे, सहाय्यक अभियंता कपिल गाठले, सहाय्यक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी सुबोध घाणेकर, मुख्य तंत्रज्ञ शाम शिंबे, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तपास वालीव पोलिसांकडे
- काच कारखान्याने जुलै २०१७पासून सहा कोटी १७ लाख ७१ हजार ३३० रुपये किमतीची ३३ लाख सहा हजार ४९५ युनिट विजेची चोरी केल्याबाबत वाशी भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता शशांक सूर्यकांत पानतावणे यांनी फिर्याद दिली.
- त्यानुसार वसई पोलीस ठाण्यात वीज कायदा कलमानुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कारखाना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने वसई पोलिसांनी हा गुन्हा पुढील तपासासाठी वालीव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे.
-------------------