ठाणे : कोरोनाच्या उपचारादरम्यान रुग्णालय प्रशासन वापरत असणारे पीपीई कीट थेट तिप्पट दराने रुग्णांच्या माथी मारले जात असून या 'स्मार्ट' ठाणे शहरातील 'ओव्हरस्मार्ट' स्वस्तिक हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरोधात मनसेने आवाज उठवला आहे. या प्रकरणी पालिका आणि एफडीए विभागाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई न झाल्यास रुग्णालय व मेडिकल चालकांना मनसे स्टाईल धडा शिकवू, असा इशाराही देण्यात आला आहे. याबाबत हॉस्पिटल आणि मेडिकलने एकमेकांवर चालढकल केली आहे. पीपीई किट, ग्लोव्हज आणि मास्कचे अव्वाचे सव्वा दर लावून लूट केल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
ठाण्यातील अंबिकानगर परिसरात असणार्या स्वस्तिक हाॅस्पिटलमध्ये ११ ते १७ जूनदरम्यान कोरोना रुग्णावर उपचार करण्यात आले. या रुग्णाच्या एकूण बिलापैकी तब्बल ४९ हजार ३५० रुपये पीपीई किटबाबत लावण्यात आले. याबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी पाचंगे यांनी अधिक माहिती घेतली असता पीपीई किटचा दर २३५० रूपये इतका आकारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बाजारात अवघ्या ७५० ते ८०० रूपयांना उत्तम दर्जाचे फूड अँड ड्रॅग अॅडमिनेस्टेशन प्रमाणित पीपीई कीट उपलब्ध असताना तिप्पट किंमतीचे पीपीई किट नेमके रुग्णालय व मेडिकल प्रशासनाने कुठून आणले, असा संतप्त सवाल पाचंगे यांनी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणी हाॅस्पिटल व संबधित मेडिकलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पालिका उपायुक्त केळकर आणि अन्न व औषध विभाग परिमंडळ एकच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांची भेट घेत निवेदनाद्वारे त्यांनी केली. ---------------------------------------------खासगी रुग्णालय व मेडिकलच्या लुटीला रुग्ण व त्यांचे नातेवाईक प्रचंड घाबरले आहेत. अशा रुग्णांनी मनसेकडे संपर्क साधावा, याबाबत प्रशासनाकडे योग्य पध्दतीने पाठपुरावा करुन त्यांना न्याय मिळवून दिला जाईल.- संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाविभाग अध्यक्ष ओवळा माजीवडा विधानसभा
*पीपीई किटचे बिल मेडिकलने दिले त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे. हे हॉस्पिटल माझे आहे, मी मेडिकल संचालक आणि हॉस्पिटल संचालकांशी बोलून सविस्तर चर्चा करून कळवतो -
डॉ. वाय अशोक, संचालक, स्वस्तिक हॉस्पिटल
स्वस्तिक मेडिकल हे स्वस्तिक हॉस्पिटलचेच आहे आणि पीपीई किटवर जे दर लावले ते रुग्णालय प्रशासन यांच्या सांगण्यानुसार लावले आहेत.
- राजेश गेहलोत, व्यवस्थापक, स्वस्तिक मेडिकल
माझ्या मोठ्या भावाला स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे पहिल्या दिवशी पीपीई किटच टेन वेळेचा खर्च 7350 आणि पुढील सात दिवस 7050 रुपये तर एका मास्कचा खर्च 300 रुपये तर ग्लोव्ह्जचा खर्च 900 रुपये बिलामध्ये देण्यात आला. एका पीपीई किटचा एका वेळेचा खर्च 2350 रुपये इतका आकारण्यात आला.हॉस्पिटल आणि मेडिकल याना याबाबत विचारले तर त्यांनी आपापली जबाबदारी झटकून एकमेकांवर चालढकल केली. त्यांनतर आम्ही मनसेकडे तक्रार केली- प्रसाद शेटे, रुग्णाचे नातेवाईक