बोर्डी : पश्चिम रेल्वे प्रशासनाने १ आॅक्टोबरपासून गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यांतील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. नवीन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी प्रवाशांनी केली असून सह्यांची मोहीम हाती घेतली आहे.नवीन वेळापत्रकानुसार अप आणि डाऊन गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्याचा फटका डहाणू, तलासरी तालुक्यांसह गुजरातमधील प्रवाशांना बसत आहे. येथील घोलवड, बोर्डी रोड, उंबरगाव रेल्वे स्थानकांतून मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यापैकी पालघर तसेच बोईसर औद्योगिक वसाहतीत आदिवासी मजूर मोठ्या संख्येने कामाला जातात. बदललेल्या वेळापत्रकामुळे परतीचा प्रवास असुविधेचा झाला आहे. विरारहून सुटणारी सुरत शटल जुन्या वेळापत्रकानुसार पालघर रेल्वे स्थानकात ५.५८ तर बोईसर स्थानकात ६.१३ वाजता येत होती. नवीन वेळापत्रकामुळे १३ ते १५ मिनिटे अगोदर स्थानक गाठते. त्यामुळे कार्यालय अथवा कारखान्यात जनरल ड्युटी करणाऱ्यांची गाडी चुकते. डहाणू रोडनंतर लोकल सेवा नसल्याने अनेक प्रवाशांना दोन तास गाड्यांची वाट पाहावी लागते. या दगदगीचा परिणाम गाड्यांशी कनेक्ट रिक्षाचालकांनाही बसत आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक रद्द करण्याची मागणी वाढली आहे. (वार्ताहर)पश्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाचा परिणाम प्रवाशांच्या जीवनशैलीत जाणवत असून शारीरिक, मानसिक खच्चीकरण होत आहे. गाड्यांच्या वेळा पूर्ववत झाल्या पाहिजेत.- नरेंद्र भागवत, रेल्वे प्रवासी
प.रे. वेळापत्रक बदलाने झाली परवड
By admin | Published: October 09, 2015 11:30 PM