डोंबिवली: केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणल्याचा नंतर देशभरात काही नेते राजकीय स्वार्थ मनात ठेवून समाजात तेढ निर्माण करत आहेत. राज्यातही तसा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यात वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसनेही विरोधात मोर्चा काढला होता. मात्र सत्तेच्या स्वाथार्साठी बहुजन समाजाचा वापर करत आहेत. त्यामुळे यापुढे भटके विमुक्त बांधवांना पुढे करत समाजाची दिशाभूल करणं थांबवावं असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव, माजी आमदार नरेद्र पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.
नरेंद्र पवार म्हणाले की, त्यांनी बुधवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ट्विट करुन आंबेडकर यांना आवाहन केले. हा कायदा समजून घेतला पाहीजे, समाजातील एक देशभक्त नागरिक म्हणून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याऐवजी त्या कायद्याच्या संदर्भात द्वेष पसरवण्याचा प्रकार सुरू आहे. सशक्त, समृद्ध बलशाली राष्ट्रासाठी समाजातील सर्व घटकांनी पाठिंबा देणे गरजेचे आहे. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या शेजारील देशातील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आणि पारशी यासह अल्पसंख्याक समुदायाच्या व्यक्तींना सहा वर्षाच्या वास्तव्यानंतर भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्याच्या मार्फत केली आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे बिल अत्यंत महत्त्वाचे व अत्यावश्यक असताना या कायद्याच्या विरोधात जनतेत अपप्रचार व खोटी माहिती देऊन दिशाभूल करण योग्य नाही असे ते म्हणाले.
बहुजन समाज, भटके विमुक्त बांधवांना या कायद्याच्या कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जावे लागणार नाही. भटके विमुक्त समाजाच्या मुख्य प्रश्नांना बगल देत त्यांना केवळ राजकारणासाठी ढाल करून वापरणं आता वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेसने तातडीने थांबवावे. विरोधकांकडे राजकारणासाठी मुद्दे नसल्याने चांगल्या गोष्टींना पाठिंबा देण्याऐवजी कुठेही राजकारण करण्याची संधी शोधत आहेत. मात्र यामध्ये समाजाचे नुकसान होत असण्याचेही पवार म्हणाले.