प्रकाश आंबेडकरांची बदलापुरातील सभा गुंडाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 07:45 PM2019-04-24T19:45:21+5:302019-04-24T19:48:40+5:30
हेलिकॉप्टर उतरवण्यास परवानगी नाकारल्याचा आरोप
बदलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर बदलापूरात आयोजित केलेली वंचित बहुजन आघाडीची सभा आटोपूग घेण्याची वेळी आयोजकांवर आली आहे. प्रकाश आंबेडकर या सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलणार होते. मात्र त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास बदलापुरात परवानगीच न मिळाल्याने ही सभा गुंडाळावी लागल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मात्र, सकाळपासून जमलेल्या कार्यकर्त्यांचा यामुळे हिरमोड झाला आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या बदलापूर शहरातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वपक्षियांनी आपला मोर्चा बदलापूर शहराकडे वळवला होता. भाजपचे कपिल पाटील आणि कॉंग्रेसचे सुरेश टावरे यांनी शहरात शक्ती प्रदर्शन केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही शहरात शक्तीप्रदर्शन करण्याचे आयोजन केले होते. त्यासाठी बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा येथील रोडू हेंद्रे घोरपडे मैदानात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली होती. त्यासाठी सभेची पूर्ण तयारीही झाली होती. सकाळपासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी जमण्यास सुरूवात झाली होती. भर उन्हातही सभेत गर्दी होती. मात्र प्रमुख पाहुण्यांबद्दल कोणतीही सूचना मिळत नसल्याने उपस्थितांनी सावलीचा आडोसा घेताना दिसत होते. सभेची वेळ दुपारी दोनपर्यंत होती. मात्र प्रकाश आंबेडकर वेळेत बदलापूरात येऊ न शकल्याने अखेर सभा गुंडाळावी लागली. त्यामुळे दोनच्या सुमारास ही सभा रद्द् करण्यात आल्याची घोषणा उमेदवार डॉ. अरूण सावंत यांनी सभेस्थळी केली. वेळेचे कारण सभा रद्द करण्यासाठी दिले जाते आहे. मात्र प्रमुख वक्त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी बदलापूरात परवानगी दिली जात नसल्याचे कारण आता समोर येते आहे. वेळेत पोलिस प्रशासनाने परवानगी दिली असती तर सभा झाली असती असेही आयोजकांकडून केला जातो आहे. मात्र या कारणाने सभा रद्द केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सुर उमटला होता.