ठाणे : विरोधी पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असताना हे पद ठाणे शहराला नको, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घेतला होता. अखेर, कळव्यातीलच महिला नगरसेविका प्रमिला केणी यांच्या गळ्यात ही माळ पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून गुरुवारी होणाऱ्या ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. यामुळे पक्षाने अखेर कळवा-मुंब्य्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा हट्ट पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद ठाण्यालाच मिळावे. परंतु, हा मान कळवा किंवा मुंब्य्राला मिळावा, यावरून खलबते रंगली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कळवा आणि मुंब्य्रातील अशा दोन नगरसेवकांना अडीच वर्षे वाटून विरोधी पक्षनेतेपद दिले जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांच्या या कमिटमेंटलाच त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार ठाण्याला की कळवा-मुंब्य्राला, यावरून चांगलाच पेच निर्माण झाला होता.
मात्र, अखेर हा मान कळव्याला मिळाला असून तब्बल १५ वर्षे सतत निवडून येणाºया प्रमिला केणी यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे. ३० वर्षांनी विरोधी पक्षनेतेपदी महिलेची निवड होणार आहे. १९८९ साली वीणा भाटिया यांनी हे पद भूषवले होते. त्यानंतर आता प्रमिला केणी या आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. त्यामुळे महिला विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.अभ्यासू व्यक्तिमत्त्वप्रमिला केणी या कळव्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून निवडून आल्या आहेत. गेली १५ वर्षे त्या कळव्यातून महापालिकेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत. ठाणे महापालिकेच्या सर्व नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी त्या निवडून येण्याचा विक्र म त्यांच्या नावावर आहे. प्रभागात त्यांचे चांगले काम असून सभागृहात प्रत्येक विषयावर चर्चा करण्यात त्यांचा हातखंडा आहे. संयमी आणि प्रशासनाचा उत्तम अभ्यास असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.