मुंब्रा : मुंब्य्रात शुक्रवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त अदा करण्यात आलेल्या विशेष नमाजाच्या वेळी देशात सुख, शांती, समृद्धी नांदावी तसेच आर्थिक स्थैर्य लाभावे आणि कोरोनाच्या जागतिक महामारीतून सर्वांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी प्रार्थना (दुआ) करण्यात आली.
नमाजनंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी बहुतांशी बांधवांनी आलिंगनाऐवजी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त घराघरांमध्ये केलेल्या सुकामेवामिश्रित खीर आणि शिरकुर्मा या स्वादिष्ट व्यंजनाचे आप्तस्वकीयांमध्ये वाटप करण्यात आले. लहान मुलांना मिळालेल्या ईदीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ईदमुळे येथील व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांनी त्यांचे व्यवसाय बंद ठेवले होते. यामुळे येथील सर्वच बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता.