लोकमत न्यूज नेटवर्क
मुंब्रा : लसीकरणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळालेल्या मुंब्रा येथे धिम्या गतीने का होईना. परंतु, सध्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथील बहुतांश नागरिक लसीसाठी ऑनलाईन रजिस्टर करण्याऐवजी थेट जाऊन लस घेण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे काही केंद्रावर लसीसाठी रांगा लागल्याचे दिसून येते.
येथील रेल्वेस्थानकाजवळील बाजारपेठेतील जाधव चाळीमध्ये राहत असलेले नरेंद्र जाधव आणि त्यांची आई नलिनी यांनी नुकतीच लस घेतली. लसीनंतर नलिनी यांना विशेष असा त्रास जाणवला नाही, परंतु नरेंद्र यांना मात्र दुसऱ्या दिवशी अंग जड झाल्यासारखे वाटत होते, तसेच अंगात ताप वाटत होता. त्यांनी तातडीने लस घेतलेल्या मुंब्रा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी पॅरासिटेमॉल या गोळीबरोबर आणखी एक गोळी दिली. ती खाल्ल्यानंतर काही वेळातच नरेंद्र यांची प्रकृती ठणठणीत झाली. लस घेतल्यानंतर होत असलेल्या हलक्याशा शारीरिक त्रासाबद्दल लस घेतलेल्या मित्राकडून ऐकल्यामुळे लस घेण्याबाबत मानसिक तयारी होत नसल्यामुळे अद्याप घेतली नसल्याची माहिती सलीम अन्सारी या तरुणाने दिली.
येथील वृद्ध मोहम्मद शेख आणि त्यांची पत्नी जरीना यांची लस घेण्याची इच्छा होती. परंतु, लस घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची त्यांनी जेव्हा मानसिक तयारी केली त्यावेळी केंद्रामध्ये लस संपली असल्याचे त्यांना कळले. यामुळे लस न घेताच ते त्यांच्या मूळगावी गेले. ही गत इतर वृद्धांची होऊ नये यासाठी किमान वृद्धांसाठी तरी घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मोहीम सरकारने सुरु करावी, अशी मागणी शेख केली आहे.
----------------------
रांगेत सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा
लसीसाठी केंद्राबाहेर लागत असलेल्या रांगामध्ये अनेकदा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे अनेकदा दिसून येते. यामुळे या रांगामधूनही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे होऊ नये यासाठी लसीकरण केंद्राबाहेर रांगेत उभे राहाणारे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत की नाही, याची खातरजामा करण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी दिव्यातील समाजसेवकांनी केली आहे.