मीरा रोड : मीरा-भाईंदर मनपाच्या लसीकरण केंद्रात वसई-विरारमधील नागरिक येऊन लस घेऊन जात असल्याचे वृत्त २३ एप्रिलच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरातील नागरिकांचे लसीकरण प्राधान्याने केले जाणार असे आश्वस्त केले होते. त्याआनुषंगाने आता लसीकरण केंद्रावर आता आधारकार्डवरील पत्ता तपासून शहरातील स्थानिक नागरिकांना लस देण्यात प्राधान्य दिले जात आहे.
शासनाकडून मीरा-भाईंदरला मिळणारा लसीचा कोटा हा अतिशय कमी आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज ४०० ते ५०० लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु, शहरातील लसीकरण केंद्रांवर वसई तालुक्यातील लोक लाभ घेत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला होता.
लसीकरणासाठी येणाऱ्यांची नोंदणी होताना त्याच्या आधार ओळखपत्रावरून तो कुठला रहिवासी आहे हे कळते. परंतु, केंद्रावरील नोंदवहीत मात्र केवळ लस घेणाऱ्यांचे नाव व मोबाइल क्रमांक घेतला जातो. तो रहिवासी कुठला आहे याची नोंद घेतली जात नाही. जेणे करून वसई तालुक्यातून १० ते २० टक्के लोक लस घेण्यासाठी येत असल्याचे सांगितले जात होते. ऑनलाइन व ऑफलाइन प्रकरणांत वसईचे नागरिक लसीकरणास येत असल्याने मीरा-भाईंदरमधील नागरिकांना मात्र लसीकरणासाठी विलंब लागत होता.