लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकादशी... अन् दुप्पट खाशी, अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. यादिवशी हमखास या म्हणीची आठवण होते. या म्हणीनुसार यादिवशी उपवासाच्या पदार्थांवर ताव मारला जातो. मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त मराठमोळ्या दुकानांत उपवासाचे पदार्थ विक्रीला सज्ज झाले आहेत. परंतु, या पदार्थांबरोबर विशेष पिठांनादेखील खवय्यांची मागणी आहे. यात भाजणीला सर्वाधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मंगळवारी आलेल्या आषाढी एकादशीदिवशी अनेकांचे उपवास आहेत. त्यानिमित्ताने खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उपाहारगृहे, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची दुकाने, मिठाईविक्रेते आणि घरगुती पदार्थ पुरवणाऱ्यांची दुकाने सज्ज झाली आहेत. एकादशीनिमित्त उकडलेल्या रताळांपासून भाजलेल्या रताळांपर्यंत कंदमुळांचे पर्याय जसे उपलब्ध आहेत, तसेच शिंगाडा, राजगिरा, भुईमुगाच्या उकडलेल्या-भाजलेल्या शेंगांचेही पदार्थ तसेच साबुदाण्याची खिचडी, वडे, थालिपीठ याबरोबरच मिठाईचे फ्युजन, दूध-दुभत्या पदार्थांना मागणी असते. यावेळेस रेडिमेड पदार्थांमध्ये साबुदाण्याचे वडे व उपवासाच्या कचोरीला मागणी आहे, असे दुकानमालक सिद्धार्थ जोशी यांनी सांगितले. २२ रुपये प्रतिनगप्रमाणे हे पदार्थ विकले जात आहेत.
काहीजण आयते उपवासाचे पदार्थ आणण्याऐवजी, त्या पदार्थांचे रेडिमेड पीठ नेऊन आपल्या आवडीनुसार, चवीनुसार ते पदार्थ नेतात म्हणून पिठाचीदेखील विक्री सुरू आहे. या पिठामध्ये उपवासासाठी खास उपवास भाजणी, उपवास डोसा, राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, वरई पीठ उपलब्ध आहे.
सोमवरपासूनच हे पीठ घरी घेऊन जात असल्याचे महेश पिंपळीकर यांनी सांगितले. कोरोनामुळे उपाहारगृहात बसून खाणे टाळत असल्याने पार्सलवर भर आहे. त्यामुळे निवडक उपवासाचे पदार्थ विक्रीला ठेवले आहेत. दोन्हीवेळेस उपवास केला जात असल्याने त्यासाठी वेगवेगळे पदार्थ करण्याकडे खवय्यांचा कल आहे.