कल्याण : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्यांना समजावणाऱ्या ३२ वर्षांच्या गरोदर महिलेला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे गर्भाच्या मानेला दुखापत झाल्याने प्रसूतीनंतर बाळाला वारंवार ताप येऊ लागल्याने या महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पूर्वेतील तिसगाव परिसरात राहणाºया दीपज्योती (नाव बदलले आहे) या गरोदर महिलेच्या आजीचे आॅगस्टमध्ये निधन झाले होते. त्यामुळे ती १२ सप्टेंबरला माहेरी गेली होती. यावेळी तिची भावजय दीपज्योतीच्या माहेरच्यांविरोधात कोळसेवाडी पोलिसात तक्रार देण्यासाठी गेल्याचे तिला भावाकडून समजले. त्यामुळे दीपज्योती माहेरच्यांसह कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेली. तेथे भावजयीच्या नातेवाइकांनी तिच्याशी भांडण केले. तर, भावजयीच्या भावाने दीपज्योतीच्या पोटावर लाथ मारली. त्यामुळे ३४ आठवड्यांच्या गरोदर असलेल्या दीपज्योतीच्या पोटात दुखू लागले.
तिला रुग्णालयात दाखल केले असता पोटातील बाळाच्या मानेवर मार लागल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर, २८ सप्टेंबरला दीपज्योतीची प्रसूती झाली. मात्र, तिच्या बाळाला वारंवार ताप येत होता.पोटात मारलेल्या लाथेमुळे पोटातील बाळाला लागल्याने सोनोग्राफीच्या रिपोर्टनुसार दीपज्योतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.