कसारा: मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेसमध्ये एका गरोदर मातेने धावत्या ट्रेनमध्ये गोंडस बाळाला जन्म दिला. या अनोळखी मातेच्या मदतीसाठी मात्र कसारा रेल्वे स्थानकात अनेक माताभगिनींचे हाथ धावले.
आज सकाळी गोरेगाव येथे राहणारा राजाबाबू दास हा आपल्या गरोदर पत्नीसह आपल्या मूळ गावी कलकत्ता येथे जाण्यासाठी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुंबई हावडा गीतांजली एक्सप्रेसनध्ये बसला. गीतांजली एक्सप्रेसने कल्याण रेल्वे स्थानक सोडल्यावर गाडी खर्डी रेल्वे स्थानकसोडून कसाराकडे येत असताना उम्बरमली ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान राजाबाबू यांची पत्नी रुमा या गरोदर मातेस त्रास होऊ लागला.
प्रसूती काळ आल्याने गाडीतील महिला सहप्रवाशांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत कसारा रेल्वे स्थानक आले. कसारा स्थानकात उतरून राजाबाबू या प्रवाशाने कसारा रेल्वे पोलिसांना मदतीसाठी विनंती केली. कर्तव्य बजावत असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल येवले, महिला पोलीस कर्मचारी पूनम हाबळे, रेल्वे सुरक्षा बल (rpf ) च्या महिला कर्मचारी स्वाती मेश्राम यांनी तात्काळ गीतांजली एक्सप्रेसमध्ये असलेल्या गरोदर मातेकडे धाव घेतली. तो पर्यंत ती गरोदर माताची प्रसूती झाली होती.
महिला पोलिसांनी दक्षता घेत त्या महिलेला रेल्वे डब्यातून सुखरूप खाली उतरवले प्रसूती झालेल्या महिलेच्या मदतीसाठी कसारा रेल्वे स्थानका जवळील देऊळवाडी येथील अंजना डोंगरे, भागीरथी भगत,कविता डोंगरे, मोहिनी भगत,पार्वती डोंगरे या महिलांनी तात्काळ कसारा रेल्वे स्थानकात धाव घेत प्रसूत महिलेच्या बाळाचे पुढील सोपस्कर पार पाडीत तिची सुटका केली. प्रसंगावधान राखीत रेल्वे पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका खासगी गाडीतून महिला व बाळ यांना तात्काळ कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी देवेंद्र वाळुंज यांनी महिलेवर तात्काळ उपचार सुरु केले..माता व बाळ यांची प्राथमिक तपासणी व उपचार करून त्यांना डिचार्ज देण्यात आला.
प्रसंगवधान राखीत रेल्वे पोलीसानी स्थानिक महिलांची मदत घेऊन प्रसूत महिलेची व बाळाची सुखरूप सुटका करून तिला पुढील वैद्यकीय उपचारासाठी कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.- वाल्मिक शार्दूल, पोलीस निरीक्षक. कल्याण लोहमार्ग..
धावत्या रेल्वेमध्ये प्रसूती झालेल्या महिलेची व बाळाची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर प्रसूतीनंतरचे सर्व उपचार करण्यात आले आहे.- डॉ. देवेंद्र वाळुंज.वैद्यकीय अधिकारी, कसारा प्रा. आ. केंद्र