लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांत गरोदर महिलांची प्रसूती केली जाते. त्यासाठी प्रसूतिपूर्व महिलांची रक्तचाचणी आणि सोनोग्राफी १०० टक्के केली जाते. त्यामुळे व्यंग बाळ जन्माला येण्याचे प्रमाण अवघे एक टक्का इतकेच आहे.
महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात सध्या सोनोग्राफीची सुविधा नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उल्हासनगरातील सरकारी मध्यवर्ती रुग्णालयात अथवा कळवा येथील सरकारी रुग्णालयात सोनोग्राफी करण्यास सांगितले जाते. तर, काही महिला खासगी सोनोग्राफी सेंटरमधून सोनोग्राफी करून घेतात; परंतु, ‘रुक्मिणीबाई’मध्ये लवकरच सोनोग्राफीची सुविधा खासगी डायग्नोस्टिक सेंटरमार्फत सरकारी दरानुसार सुरू केली जाणार आहे. दुसरीकडे, डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा माफक दरात सुरू आहे. तेथे रक्तचाचण्याही केल्या जातात; त्यामुळे या दोन्ही रुग्णालयांत सोनोग्राफी व चाचणी न करता प्रसूतीचे प्रमाण हे नगण्य आहे. परिणामी, व्यंग बाळांच्या जन्माचे प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा जास्त नाही.
सध्या सगळ्य़ा गरोदर महिला बाळाची वाढ परिपूर्ण होत आहे का, हे पाहण्यासाठी सोनोग्राफी करून घेतात. त्यामुळे तीन महिन्यांतच व्यंग असल्यास कळून येते. ‘रुक्मिणीबाई’वर प्रसूतीचा भार जास्त आहे. कोरोनाकाळात शास्त्रीनगर रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यामुळे तेथे प्रसूतीच्या जास्त केसेस घेतल्या गेल्या नाहीत. नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान ‘शास्त्रीनगर’मध्ये अवघ्या १८७ प्रसूती करण्यात आल्या. दुसरीकडे, महापालिकेचे डोंबिवलीत सूतिकागृह हे एक स्वतंत्र प्रसूतिगृह होते. मात्र, त्याची इमारत धोकादायक झाल्याने त्याची पुनर्बांधणी सात वर्षांपासून रखडली आहे.
महापालिकेने कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली येथे सुसज्ज प्रसूतिगृह बांधले. मात्र ते सुरू न झाल्याने त्याच इमारतीत महापालिकेने कोरोना रुग्णालय सुरू केले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे रुक्मिणीबाई प्रसूती विभाग बंद करून तो वसंत व्हॅलीतील सूतिकागृहात स्थलांतरित केला जाणार आहे. परिणामी लवकरच गरोदर मातांना प्रसूतीसाठी एक स्वतंत्र प्रसूतिगृह उपलब्ध होणार आहे.
---------------------
चाचणी आवश्यक
प्रसूतिपूर्व रक्तचाचणी, सोनोग्राफी या चाचण्या आवश्यक असतात. त्यानुसार त्या करून घेतल्या जातात. त्यानंतरच महिलांची प्रसूती केली जाते. सध्या प्रसूतीची तारीख जवळ येण्यापूर्वी गरोदर महिलांची कोरोना चाचणीही केली जाते आहे. त्याची सोय महापालिका रुग्णालयात करण्यात आली आहे. मात्र, प्रसूतीपूर्वी कोरोना चाचणीची आवश्यकता नाही, असे सरकारने नव्याने कळविले आहे.
---------------------
प्रसूतिपूर्व रक्तचाचण्या, आदींची सोय महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांत करण्यात आलेली आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात सोनोग्राफीची सोय नसल्याने महिलांना उल्हासनगर शासकीय रुग्णालय अथवा कळवा सरकारी रुग्णालयात ती करून घेण्यास सांगितली जाते. शास्त्रीनगर रुग्णालयात सोनोग्राफीची सोय पीपीपी तत्त्वावर माफक दरात उपलब्ध आहे. तीच सुविधा लवकर रुक्मिणीबाई रुग्णालयातही सुरू केली जाणार आहे.
- डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.
----------------------
वर्षभरात केडीएमसी रुग्णालयांतील प्रसूती
रुक्मिणीबाई रुग्णालय - १४९६
शास्त्रीनगर रुग्णालय - १८७
एकूण - १,६८३
किती बालकांमध्ये व्यंग - एक टक्का
किती टक्के महिलांनी प्रसूतिपूर्व चाचणी केली नाही - ५ टक्के
------------------------