लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आता गरोदर महिलांनाही लस घेता येणार असल्याने ठाण्यातील खासगी रुग्णालयात त्यांना लस देण्यास सुरुवात झाली. गरोदर महिला कोणत्याही महिन्यात लस घेऊ शकतात. त्यांना त्रास होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे न घाबरता, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने गरोदर महिलांनी लस घ्यावी, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
मागील वर्षभरात कोरोनामुळे अनेकांचे प्राण गेले. अनेकांनी कोरोनावर मात केली. ठाणे जिल्ह्यात ५ लाख ३३ हजार १३५ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ५ लाख १७ हजार ४९० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. १० हजार ७५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्ह्यात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. कोरोनाला रोखण्यासाठी लस महत्त्वाची असल्याने हेल्थ वर्कर, फ्रन्टलाईन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिक आणि आता १८ वर्षावरील नागरिकांना लस उपलब्ध करून दिली. ठाण्यात आतापर्यंत ५ लाख ८७ हजार ९३४ जणांना लस देण्यात आली. यामध्ये पहिला डोस ४ लाख ६४ हजार २६७ जणांना, तर दुसरा डोस १ लाख २३ हजार ६६७ जणांना देण्यात आला.
आता गरोदर महिलांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. गरोदर महिला लस घेण्यासाठी काहीशा तयार नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयातून तसेच जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती सुरू आहे. लस घेण्याचे कोणतेही विपरित परिणाम होत नसल्याने गरोदर महिलांनी पुढे येऊन लस घेणे गरजेचे आहे. परंतु लस घेताना ती केव्हा घ्यावी, दोन लसींमध्ये किती दिवसांचे अंतर असावे, याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांकडून घेऊनच लस घ्यावी. तसेच लस कोणत्याही महिन्यात घेता येते, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु ज्या महिलांना रक्तदाबाचा त्रास असेल, अशा महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस घ्यावी.
............
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण - ५, ८७,९३४
पुरुष - ३, ०५, ८१४
महिला -२, ७६, ७८१
पहिला डोस - ४, ६४, २६७
दुसरा डोस - १,२३,६६७
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी..
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी प्रसूतीतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लस घ्यावी. ज्या महिलांना रक्तदाबाचा त्रास असेल, त्या महिलांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन लस घ्यावी. लस घेतल्याने कोणताही त्रास होत नाही. केवळ ताप किंवा कणकण येण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर महिला कोणत्याही महिन्यात लस घेऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक गरोदर महिलेने लस घ्यावी. परंतु गरोदर महिलांना फ्लूची किंवा इतर लसीही द्याव्या लागत असतात. त्यामुळे दोन लसींमध्ये किमान १५ दिवसांचे अंतर असणे अपेक्षित आहे.
- डॉ. महेश बेडेकर, स्त्री रोगतज्ज्ञ, ठाणे
............
कोरोना लसीचे साईडइफेक्ट होत नाहीत. गरोदर महिलांनी पुढे येऊन लस घ्यावी. यासाठी प्रशासनाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. इतरांना ज्या पध्दतीने त्रास होतो, तसाच काहीसा त्रास गरोदर महिलांनादेखील होतो.
- डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
............