भार्इंदर : मीरा रोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन सुमारे दोन वर्षांपूर्वी झाले. या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. सुरुवातीला सुशोभीकरणाच्या आड येणारी बांधकामे पालिकेने जमीनदोस्त करून सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा केला. शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे २५ ते ३० टक्के लोकसंख्या मीरा रोड परिसरात आहे. ज्या प्रमाणात या क्षेत्राचा विकास झाला, त्या प्रमाणात येथील रेल्वे स्थानक परिसरात बजबजपुरी वाढली. या स्थानकातून रोज हजारो प्रवासी लोकलने प्रवास करतात. रेल्वे स्थानक गाठण्यासाठी प्रवाशांना मात्र परिसरातील फेरीवाले, रिक्षांचे पार्किंग यातून वाट काढावी लागते. त्यातून सुटका होण्यासाठी येथे स्कायवॉक बांधण्यात आला. तोसुद्धा केवळ रेल्वे स्थानकाजवळील प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना नित्यनेमाने गर्दीतूनच रेल्वे स्थानकात ये-जा करावी लागते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार मुझफ्फर हुसेन यांनी स्थानक परिसराचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याचे ठरवले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सुशोभीकरणाचा सुमारे २५ कोटींचा प्रस्ताव पालिकेला सादर केला. त्यासाठी आमदार निधीतून सात कोटी देण्याचे मान्य केले. भूमिपूजनही हुसेन यांच्या हस्ते झाले होते. परंतु, सुशोभीकरण पर्यावरणवादी धोरणात अडकल्याने प्रशासनाने तो प्रस्ताव गुंडाळला. दोन वर्षांनंतर पुन्हा त्या सुशोभीकरणाची आठवण प्रशासनाला झाल्याने त्यांनी सुशोभीकरणाच्या आड येणारी बांधकामे, फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम सुरू केली आहे.अधिकृत टपऱ्या व बांधकामांना पर्यायी जागा देत अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.