वाडा : थकबाकी आणि वीजचोरीवर मात करण्यासाठी वसई महावितरणने अशा कायम स्वरूपी थकबाकीदार ग्राहकांना प्रीपेड मिटरद्दारे वीज जोडण्या देण्याची संधी दिली असून ही योजना वाडा उपविभागाअंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागात अनेक ग्राहक वीज बिल वेळेवर भरत नाहीत. त्यामुळे थकबाकी वाढत जाते आणि त्यावरील व्याजामुळे रक्कम अजूनच फुगते. थकबाकीची रक्कम किंवा त्या वरील व्याज यामुळे ग्राहक नवीन वीजजोडणी घेण्यास नाखूष असतात वाड्यातील ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण जास्त आहे. सर्रास आकडा टाकून वीज वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. हा अपराध अजामीनपात्र गुन्हा असून त्यात तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी महावितरणने ही अनोखी योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमार्फत थकबाकीदार ग्राहकांकडून मूळ रक्कम १०० रु. भरून घेऊन त्यांना ३ हजार रु पयांत सिंगल फेज जोडणीची रक्कम भरून ती देण्यात येईल. यामध्ये मूळ रक्कमेवरील व्याज माफ करून फक्त मूळ रक्कम भरल्यानंतर प्रीपेड मीटरची जोडणी मिळेल.या नविन प्रीपेड मीटरद्दारे थकबाकीदार ग्राहकाने विज जोडणी घेऊन सन्मानाने विज वापर करावा व चोरीच्या संभाव्य अपराधापासून मुक्त व्हावे. तसेच यापुढे वीजचोरी विरूध्दची मोहिम महावितरण तीव्रपणे राबविणार आहे. तरी लवकरात लवकर या योजनेचा ग्राहकांनी फायदा घ्यावा असे आवाहन वसई महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. डी. गायकवाड यांनी केले आहे.
थकबाकीदार वीज ग्राहकांना प्रीपेड मीटर
By admin | Published: November 26, 2015 1:28 AM