ठाणे : रिक्षांच्या रांगेतून प्रवाशांची सुटका व्हावी, भाडे नाकारणारे रिक्षांचालक वठणीवर यावेत. ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, जेवढा प्रवास केला तेवढेच भाडे प्रवाशांनी द्यावे, या हेतूने ठाणे स्टेशन परिसरात मे महिन्यात प्रीपेड आॅटो सेवेचा नारळ फोडला. त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसतांनादेखील आता ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने ठाण्यातील प्रत्येक बसथांब्यावर ही सेवा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातही प्रिपेड रिक्षाची संकल्पना आली. यासाठी ठाण्यातील विजू नाटेकर रिक्षा, टॅक्सी युनियनने पुढाकार घेऊन ती हाती घेतली. यानुसार रिक्षासाठी प्रवाशांना रांगा लावण्याची गरज नाही, किंबहुना एखादा रिक्षाचालक भाडेसुद्धा नाकारु शकत नाही. ही वैशिष्टे असली तरी सुरु वातीला तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर मात्र अनेक प्रवाशांनी प्रीपेड रिक्षांचा वापर केला आहे. आतापर्यंत ३ हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला असून यामध्ये ८० टक्के महिलांचा समावेश आहे. केवळ ठाण्यात अशा प्रकारची सुविधा देण्याबरोबरच इतर शहरांमध्येदेखील अशा प्रकारची सुविधा असावी अशी मागणी प्रवाशांकडून झाल्याने आता मिरारोड आणि भार्इंदर रेल्वेस्थानक आणि ठाण्यातील बस स्थानकांवर ती सुरु करण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे. ठाण्यात मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या वंदना आणि खोपट डेपो अशा दोन ठिकाणी सुरुवातीला ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या येत असल्याने प्रवाशांना कधीही रात्री बेरात्री येथे उतरावे लागते. त्यामुळे अशा प्रवाशांसाठी ती अत्यंत उपयोगी पडणार आहे. (प्रतिनिधी)
रेल्वे स्टेशनपाठोपाठ आता बसस्थानकांवर प्रीपेड रिक्षा
By admin | Published: October 28, 2015 11:15 PM