डोंबिवली - दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ वर पत्र्याच्या शेड टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा असला तरी ते काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे. पावसाळयाच्या आत ते काम पूर्ण होणे आवश्यक असून पहिल्या पावसात कुठे गळती होत असेल तर त्याची दुरुस्ती देखील करणे आवश्यक आहे. फलाटांमध्ये लाद्याही पावसाआधीच बसवाव्यात आणि कामाचा चांगला दर्जा राखावा असे संघटनेचे म्हणणे आहे.
दिवा वसई मार्गे जाणाऱ्या गाड्या त्या फलाटावर उभ्या राहतात. त्यासाठी हजारो प्रवासी त्या फलाटांमध्ये जातात, त्यांचीही गैरसोय टाळावी. सध्याच्या कामाचा वेग मंदावला असून फलाटावर पत्रे आणून ठेवले आहेत. अजून बरेच काम बाकी असून शेडसाठी सांगाडा उभा करणे देखील गरजेचे आहे. त्यासाठी वेल्डींग यंत्रणेसह लोखंडी रॉड्स, मोठे लोखंडी खांब आदींसह साधनसामग्री फलाटामध्ये ठेवली आहे. मे महिना अर्धा संपला असून आता पुढील पंधरवड्यात कामाचा वेग वाढायला हवा, अन्यथा पावसाला सुरुवात झाली तर गैरसोयीत भर पडेल. तसेच कामाचा दर्जा राखणेही शक्य होणार नाही. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने लक्ष द्यावे, आणि कामाला गती द्यावी अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत यांनी केली आहे.
पत्रे लावल्यानंतर लाद्या बसवाव्यात. जेणेकरुन पहिल्या पावसाचे पाणी थेट पत्र्यावरुन ओघळीमधून खाली येईल. पावसाचे पाणी थेट काम सुरु असलेल्या लाद्यांवर येणार नाही. आणि पत्र्याच्या शेडमुळे पाण्याशी थेट संपर्क येणार नसल्याने नव्याने काम झालेल्या लाद्यांना मजबुतीसाठी काहीसा वेळ मिळेल. त्या कामांचा दर्जा राखण्यासाठीही रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे असेही ते म्हणाले.