ठाणे : मार्च महिना म्हणजे मराठी काव्य विश्वातील पाडगावकर आणि मर्ढेकर यांचा महिना.या सोबतच जागतिक काव्य दिन हा अनोखा संगम. या अनोख्या संगमाचे औचित्य साधत अभिनय कट्ट्यावर काव्यसंध्येमध्ये प्रामुख्याने मर्ढेकर, पाडगावकर आणि कुसुमाग्रज या कवींच्या कवितेचा सामावेश होता. यावेळी कट्ट्याचे कलाकार संकेत देशपांडे, राजश्री गढीकर, वीणा छत्रे, वैभव चव्हाण, आदित्य नाकती आणि गणेश गायकवाड या कलाकारांणी काव्य वाचन केले.
सुरवातीला संकेत देशपांडे याने कुसुमाग्रज यांची क्रांतीचा जयजयकार आणि अखेर कमाई या कविता सादर केल्या आणि तात्यासाहेबांच्याच्या शब्दांद्वारे त्यांच्या आठवणीला उजाळा दिला. मराठी साहित्य विश्वात सौंदर्यवाद प्रामुख्याने मांडणारे कवी म्हणजे नवकवी बा.सी.मर्ढेकर. राजश्री गढीकर यांनी मर्ढेकरांच्या अजून वास येतो फुलांना, आला आषाढ श्रावण या कवितांद्वारे मर्ढेकरांना आदरांजली वाहिली. कविता म्हंटल कि अनेकांच्या परिचयाच नाव म्हणजे मंगेश पाडगावकर. काव्यसंध्येच्या निमित्ताने पाडगावकरांच्या देखील कविता कट्ट्यावर सादर करण्यात आल्या ज्या मध्ये वैभव चव्हाण याने मी ‘कुठे म्हणालो परी मिळावी..फक्त जरा बरी मिळावी’ अशी सुरवात करताच अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले तर आदित्य नाकती याने पाडगावकरांनी रचेलेली माधुरी दिक्षीत ह्या नटीवर रचलेल्या कवितारुपी ओळी सादर केल्या. प्रसंगी साधना ठाकूर यांनी मर्ढेकरांची अस्थायी या कविता सादर करत रसिकांचे मनोरंजन केले.
पुढे वीणा छत्रे हिने ‘किती तरी दिवसांत आणि सकाळी उठोनी ’या कविता सादर करत मर्ढेकरांना नवकवी हि उपाधी का लागू पडते याचे जणू प्रात्यक्षिकच दिले तर गणेश गायकवाड याने कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं हि कविता सादरिकरणाने वातावरणात गंमत आणत तात्या साहेबांनी प्रेमाबद्दल दिलेली शिकवण रसिकांपर्यंत पुन्हा एकदा पोहचवली.‘उधळून दे तुफान सारमनामध्ये साचलेलं प्रेम करावं भिल्लासारख बाणावरती खोचलेलं’ या अंतिम ओळीनी रसिकांच्या टाळ्या लुटल्या. पुढे राजश्री गढीकर यांनी पाडगांवकरांच्या गाण्यावरचं बोलगाणं या कवितेसोबतच आजोबांच्या खोलीत धुकं धुकं धुकं.. या कवितेद्वारे सर्वांना आपपल्या प्रेमळ आजोबांची आठवण करून दिली. या वेळी काव्यसंध्येचा आस्वाद घेण्यासोबतच या मध्ये अधिक रंग भरण्यासाठी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे हे देखील उपस्थित होते. प्रसंगी त्यांनी काव्य सादरीकरणाबद्दल प्रेक्षकांना माहिती देत स्वतःच्या अनोख्या शैलीतील काही कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या अंतिम सदरात त्यांनी प्रेक्षकांना सुरेश भट रचित लाभले आम्हास भाग्य हे मराठी अभिमान गीत सामुहिक रित्या म्हणण्याचे आव्हान केले.त्याच्या या आव्हानाला प्रतिसाद देत मराठी अभिमान गीताने कट्ट्याचा परिसर दणाणून निघाला. आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सरतेशेवटी कट्ट्याच्या काही कलाकारांना त्यांच्या वाढदिवसाच्या भेटी देखील म्हात्रे यांच्या हस्ते बहाल करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात प्रार्थनेने सुरवात झाली सोबतच ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी विठ्ठल जाधव व प्रकाश वैद्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन पार पाडण्यात आले. तद्वत एकपात्री प्रयोगांद्वारे सादरीकरणास सुरवात झाली, ज्यामध्ये तब्बल १५ कलाकारांच्या नाट्यछटांचा समावेश होता. शिल्पा लाडवंते हिने सादर केलेली शाहरूखची फ्यान, स्वप्नील माने याने वठवलेला सखाराम बाईंडर मधील सखाराम या पात्राचा प्रवेश, रुक्मिणी कदम यांची लेडी रिक्षावाली, लवेश दळवी याने उडवलेली त्रेधातिरपिट या एक्पात्रीचा समावेश होता तर या सोबतच नूतन लंके ,शुभांगी भालेकर, रोशनी उंबरसाडे, अनिकेत शिंदे, रोहित मुणगेकर, कुंदन भोसले,रोहिणी थोरात, शनी जाधव व रोहिणी राठोड या कलाकारांनी विविध विषयांवरील एकपात्रीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले.स्थानिक बालकलाकार यतार्थ कुलकर्णी याने एक चतुर नार या गाण्यावर नृत्य सादर करत उपस्थितांच्या टाळ्या लुटल्या. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा विना छत्रे आणि आणि संकेत देशपांडे यांनी संयुक्तरित्या सांभाळली.