कल्याण : स्थायी समितीच्या शुक्रवारच्या सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. प्रभागासंदर्भातील विषय सभेत येत असतात. त्याला संबंधित जबाबदार अधिकारी उत्तरे देण्यासाठी नसतो. यापुढे प्रभाग अधिकाऱ्यांनीही स्थायीच्या बैठकीला उपस्थित राहायलाच हवे, असे आदेश सभापती संदीप गायकर यांनी दिले. सदस्या राजवंती मढवी यांनी सभेला सुरुवात होताच प्रभागात होत असलेल्या बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. प्रभाग अधिकारी शांतिलाल राठोड यांना वारंवार दूरध्वनी करूनही ते प्रतिसाद देत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रभाग अधिकाऱ्यांचे हे वर्तन चुकीचे असून यामुळे बेकायदा बांधकामे राजरोसपणे उभी राहत असल्याचा आरोप मढवी यांनी केला. वारंवार आदेश देऊनही प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. क प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांच्याबाबतीत दिलेल्या आदेशाचे उदाहरण देताना प्रशासन कामचुकार अधिकाऱ्यांना अभय देत असल्याकडे अन्य सदस्यांनी लक्ष वेधले. दरम्यान, मढवी यांच्या आरोपांवर संबंधित प्रभाग अधिकारी राठोड यांना स्थायीच्या बैठकीला बोलवून घ्यावे, अशा सूचना सभापती गायकर यांनी दिल्या होत्या. मात्र त्यांच्यावतीने अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुरेश पवार यांनी उपस्थित राहून त्यांची बाजू मांडत ठोस कारवाईचे आश्वासन दिले.दरम्यान यापूर्वीचा अनुभव पाहता स्थायी समितीने दिलेल्या आदेशाची प्रशासन किती काटेकोरपणे पालन करते हे पहाणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती सक्तीची
By admin | Published: October 24, 2016 2:07 AM