ठाणे : जैविक विविधता ही निसर्ग व मानवाच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे याची अनेक जिवंत उदाहरणे देऊन विद्या प्रसारक मंडळाचे ॲडव्हान्स स्टडी सेंटरच्या प्रमुख डॉ. माधुरी पेजावर यांनी ठाण्यातील एकेकाळची नैसर्गिक परिस्थिती व आजची परिस्थिती यातला फरक उलगडून सांगितला, तसेच यामुळे येथील वातावरणावर झालेला परिणामही समजावून सांगितला.
विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधि महाविद्यालयाचे विधि सेवा केंद्र आणि जिल्हा विधि सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या माध्यमातून शुक्रवारी आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस आणि आंतरराष्ट्रीय नो टोबॅक्को डे व कामगार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ‘कोविड-१९ परिस्थितीमधील जैविक विविधतेचे महत्त्व’ या विषयावर डॉ. पेजावर यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाचे उद्घाटन एम.आर. देशपांडे, सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि प्रभारी प्राचार्य डॉ. श्रीविद्या जयकुमार यांच्या हस्ते झाले. ‘गुगल मीट’ या डिजिटल मंचावर हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात डॉ. महेश बर्वे आणि डॉ. सुरेश पाटणकर यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. ॲड. विक्रम यादव यांनी बांधकाम व शेतमजूर यांच्या समस्या मांडून कायदे व जागृतीद्वारे त्या दूर करण्याच्या मार्गांची माहितीही दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या शंकांचेही मान्यवरांनी निरसन केले. सेवा केंद्राचे प्रभारी प्राध्यापक विनोद वाघ यांनी आभार मानले.