ठाणे : ‘सवोॅच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने निकाल दिला आहे. त्याकडे पाहता, अंतिम निकाल येईपर्यंत सध्याचे राज्य सरकार घटनाबाह्यच आहे’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. या निकालावर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी २३ मे राेजी “चला या, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ या' या चर्चासत्र आयाेजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सायंकाळी ६ वाजता हे चर्चा पार पडणार आहे.
येथील राष्ट्रवारी काॅंग्रेस कायार्लयात परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्याचे सर्वप्रकारची अन्वयार्थ याबाबत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली. तसंच राज्य सरकार घटना घटनाबाह्य असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला त्यांच्या साेबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे शहर प्रवक्ते राहुल पिंगळे, जिवाजी कदम आदी उपस्थित होते.
'चला या, मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊ या..' या चर्चासत्रात न्यायालयाच्या आदेशाचे सर्व बारकावे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना समजवून सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या १४१ पानांच्या निकालपत्राचे विश्लेषण होणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे जनतेची दिशाभूल करीत आहेत. सध्या खोटे बोल पण रेटून बोल, अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. हा खोटेपणा उघडकीस आणण्याची सुरूवात ठाण्यातून करण्यात येत असल्याचे यावेळी परांजपे यांच्यासह चव्हाण, शिंदे आदींनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदेंवरही परांजपे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे डाॅक्टर आहेत. पण, त्यांचा कायद्याचा अभ्यास किती आहे, हे आपणाला माहीत नाही. त्यांनी निकालपत्र आधी अभ्यासावे. त्यानंतर त्यावर बोलावे, असा टोलाही परांजपे यांनी यावेळी लगावला.
गोगावले यांचे प्रतोदपद बेकायदेशीर ठरविले आहे. त्यानुसार सुनील प्रभू हेच प्रतोद असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे गोगावले यांचे प्रतोतपद रद्द केल्याने त्यांच्या नियुक्तीनंतर झालेले सर्व निर्णय चुकीचे ठरत असल्याचे विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राबाबत यावेळी माहिती देण्यात आली.