ठाणे : प्रस्तावित मुंबई -हैद्राबाद अतिजलद रेल्वेसंदर्भात (हायस्पीड) आज ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. नॅशनल हायस्पीड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित मुंबई हैद्राबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पामुळे होणारे सामाजिक व पर्यावरणीय जजागृती करण्यासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थ, पर्यावरण विषयातील कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.
उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) प्रशांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशनचे उपमहाव्यवस्थापक एस.के. पाटील, एजिस इंडिया प्रा. लिमिटेडचे प्रकल्प संचालक सत्यव्रत पांडे, शाम चौगुले उपस्थित होते. प्रकल्पाच्या सल्लागार डॉ. अपर्णा कांबळे व प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रकल्पापूर्वी करण्यात येणाऱ्या सामाजिक व पर्यावरणीय सर्वेक्षण वअभ्यासासंबंधी सादरीकरण केले.
प्रशांत सुर्यवंशी म्हणाले की, प्रस्तावित मुंबई-हैद्राबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या मार्गावरून ही रेल्वे जाणार आहे, तेथील ग्रामस्थांना या प्रकल्पासंदर्भात माहिती व्हावी, यासाठी ही बैठक झाली. यावेळी उपस्थितांनी केलेल्या सूचनांची दखल हा प्रकल्प राबविणाऱ्या महामंडळ घेणार आहे. तसेच ज्या भागातून ही रेल्वे जाणार आहे, तेथील ग्रामस्थांना गावोगावी जाऊन या प्रकल्पाची माहिती महामंडळामार्फत दिली जाईल.
डॉ. कांबळे यांनी सामाजिक अभ्यास कशा प्रकारे केला जाईल याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सध्या या प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे होणाऱ्या परिणामाविषयीचाही अभ्यास करण्यात येत आहे. त्याचबरोबर पर्यावरण, वाहतुकीवरील परिणाम, बाधित कुटुंबांवर व संबंधित गावावर होणारे परिणाम आदींचा अभ्यास व सर्वेक्षण करण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे ड्रोनद्वारेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. गावागावात जाऊन ग्रामस्थांकडून माहिती घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
असा आहे प्रकल्प· मुंबई ते हैद्राबाद हायस्पिड रेल्वे ही एकूण 649.76 किमी धावणार· हा मार्ग संपूर्ण ग्रीन कॉरिडॉर असणार· सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू· दहा डब्ब्यामध्ये 750 प्रवासी वाहतूक क्षमता· प्रवासाचा कालावधी 14 तासावरून 3 तासांवर येणार· ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद व हैद्राबाद अशा दहा स्थानकांचा समावेश· महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, सोलापूर या चार जिल्ह्यातून धावणार रेल्वे· ठाणे जिल्ह्यातील एकूण 9 किमीचा समावेश· प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुमारे 1200 हेक्टर जमिन लागणार· ठाण्यातील म्हातार्डी, बेटावडे, आगासन टारफे-पाचनाड, उसळघर, काटई, नारिवली, निघू, बमाली, निळजे, घेसर, वडवली (ख) या गावांचा समावेश.