ठाणे : अभिनय कट्टयावर "मिरज दंगल" ही एकांकिका सादर करत कलाकारांनी रसिकांना दंगलीच्या वातावरणात नेले. आर्चिस पाटील याने दंगलीतील स्वअनुभवावर ही सत्य घटना एकांकिकेत लिखाणाच्या माध्यमातून मांडली.याचे दिग्दर्शन प्रेम कानोजीया याने केले होते.यंदाचा हा ४०६ क्रं चा कट्टा होता.
भर गणेशोत्सवात मिरज शहरामध्ये दंगलीचा भडका उडतो. सर्वत्र जाळपोळ सुरू होते आणि बघता बघता मिरज शहराला पोलिस छावणीचं रूप येतं. दंगल घडवणारे आणि दंगलीचे परिणाम भोगणारे आपआपला जीव मुठीत धरून जागा मिळेल तिथे लपण्याचा प्रयत्न करू लागतात. अश्यातंच एक रक्ताने माखलेला हिंदू युवक हातात लोखंडी रॉड घेऊन जिवाच्या आकांताने धावत एका अडगळ खोलीमध्ये येऊन लपतो. पण ह्या खोलीत अजुन एका हिंदू युवकाचा प्रवेश होतो. त्या नंतर ह्या दोघांमध्ये काही छोट्यामोठ्या गोष्टींवर मतभेत सुरू होतात आणि तो जखमी युवक त्या खोलीत लपलेल्या प्रत्येक व्यक्तीला मारण्यासाठी आटापिटा करतो. कालांतराने दंगल करणाऱ्या दोन्ही समाजाचे खरे चेहरे समोर आल्याने त्या युवकामध्ये नेमका बदल होतो, तो हिंसेकडून अहिंसेकडे प्रवृत्त होतो. हे सांगणारी ही कथा होय. थोर महात्म्यांच्या नावाने ह्या देशात आपले वर्चस्व मिळवू पाहणाऱ्या युवकांची ही कथा आहे. धर्म आणि कर्म ह्या दोहोंचा विचित्र मेळ करून कर्मकांड करू इच्छिणाऱ्या प्रत्येकावर या एकांकिकेतून टीका करण्यात आली असून अखंड देश हाच धर्म आहे,हीच एकात्मता आहे असे या सादरीकरणाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. यात सिद्धार्थ ठाकूर,निखिल चव्हाण,गणेश विंचाळ, प्रकाश शिंदे, श्रद्धा गुजर, अनिकेत सावंत, तुषांत चिले, आकाश शिंदे, वैभव उबाळे, आर्चिस पाटील या कलाकारांनी काम केले. वैष्णवी पोतदार, रूचिका हातिपकर यांनी रंगमंच व्यवस्था पार पाडली, अक्षय दाभाडे याने ध्वनी संयोजक व आदित्य दरवेस याने प्रकाशयोजना केली होती. यावेळी सहदेव कोळंबकर याने निवेदन केले व जेष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी संजीत पाटकर यांनी दीपप्रज्वलन केले. एखाद्याने एखाद्यावर भिरकावलेला दगड,एखाद्यावर उगारलेली तलवार हिंसाच होय. पण दगडाला जरी जात नसली तरी तो दगड मारणाऱ्याचे हात कोणत्यातरी जातीचे असतात हे आपल्या देशाचं दुर्दैव होय असे मत अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी यावेळी मांडले.