ठाणे : चारशेव्या कट्ट्याकडे वाटचाल करणाऱ्या अभिनय कट्टयावर दिवसेंदिवस नवनवीन नाट्यप्रयोग सादर केले जात आहेत.यात आणखी भर पडली "प्रवास अभिनय कट्ट्याचा"या सादरीकरणाची.रविवारी झालेल्या ३९५ क्रं च्या कट्टयावर कट्ट्याच्या कलाकारांनी हे पथनाट्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमात गेल्या आठ वर्षात सातत्याने अभिनय कट्ट्याने कला क्षेत्रात केलेले काम पथनाट्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले. हजारो कलाकारांनी आतापर्यंत कट्टयावर पात्रे साकारली. नाटक,सिनेमा,मालिका या क्षेत्रात अभिनय कट्ट्याचे कलाकार आपला झेंडा रोवून आहेत.कलाकार म्हणून काम करत असताना अभिनय कट्टा व किरण नाकती यांचे मार्गदर्शन कसे मोलाचे ठरत आहे हे या सादरीकरणात पहायला मिळाले. २९ ऑगस्ट २०१७ रोजी मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण कट्टयावर पाणी साचले होते. मात्र किरण नाकती आणि कट्ट्याच्या कलाकारांनी हिम्मत न सोडता कट्टा पुन्हा सुरु केला.कट्ट्याप्रति कलाकारांची असलेली श्रद्धा आणि तळमळ या सादरीकरणात दाखवण्यात आली. ओंकार मराठे,सहदेव साळकर,सहदेव कोळंबकर,कुणाल पगारे, धनेश चव्हाण,उत्तम ठाकूर,वैभव पवार,रोहित सुतार,प्रथमेश जाधव,हेमंत यादव या कलाकारांनी यात काम केले. कट्ट्याचे निवेदन वैभव चव्हाण याने केले.दीपप्रज्वलन संभाजी आंद्रे यांनी केले.शुभांगी भालेकर यांनी जागतिक कन्या दिना निमित्त अभिवाचन केले.