ठाणे : सातत्याने नवनवीन कलाकारांना अभिनयासाठी व्यासपीठ मिळवून देणाऱ्या अभिनय कट्ट्यावर दर रविवारी दर्जेदार नाटके सादर केली जातात. यंदाच्या रविवारी "अडम तडम" ही एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर झाली आणि या एकांकिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. यंदाचा हा ३८३ वा कट्टा होता.
मुलीच केवळ परीक्षांमध्ये पहिला नंबर पटकावतात या वेड्या आशेने मुलीला जन्म देऊ इच्छिणाऱ्या वडिलांच्या घरात पुन्हा एकदा दुसरा मुलगाच जन्म घेतो.या चिडी पोटी एका वडिलांनी मुलाला मेरिट मध्ये येन्यासाठी केलेले हाल आणि आपण नेमके मुलगा आहोत की मुलगी असा त्या मुलाला पडलेला संभ्रम या एकांकिकेत दिसतो.हसत हसत प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या या एकांकिकेचे दिग्दर्शन राजेश शिंदे आणि यश नवले या तरुण जोडीने केले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात सगळ्यांनाच पहिला नंबर पटकवण्याची घाई आहे. आणि हया स्पर्धांची खरी सुरवात होते ती म्हणजे शाळेतून. विषय समजून घेणं, ज्ञानात भर पाडणं हया पेक्षाही शाळेत महत्वाचं झालंय ते म्हणजे आपल्या वर्गात पाहिलं येणं. पुस्तकांच्या ओझ्यानी भरलेली दप्तर ते नसमजणाऱ्या किचकट विषयांचा ताण, हे सगळंच आजच्या मुलांना सहन कराव लागत. ते देखील फक्त एकच कारणासाठी "मेरीट मध्ये पाहिल येण्यासाठी". हया मुलांचे आई-वडील सुद्धा हया स्पर्धेचा नकळत एक भाग बनून जातात, आणि स्वतःच्या कुटुंबा भोवती स्वतःच ही स्पर्धेची चौकट आखू लागतात. "अडम-तडम" कथा आहे अश्याच एका कुटुंबाची. मेरिट मध्ये पहिलं येण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेला बाप, ते स्वप्न आपल्या मुलांमध्ये पाहतो. हया एका हव्यासापोटी नकळत बरेचसे टोकाचे निर्णय घेतो, हे निर्णय आपल्या मुलांवर, कुटुंबावर काय परिणाम करू शकतील ह्याचा विचार न करता. मग सुरू होतो एक गमतीदार खेळ एकमेकांना चुकीचं ठरवण्याचा, आपले निर्णय एकमेकांवर लादण्याचा, जिद्दीला पेटून स्वतः घेलतेले निर्णय योग्य ठरवण्याचा. ही एकांकिका पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने उपास्थित होते.या एकांकिकेचे मूळ लेखक सुधीर सुखठणकर असून राजेश शिंदे यांनी याचे नाट्यरूपांतरन केले आहे.दिग्दर्शन राजेश शिंदे आणि यश नवले यांनी केले आहे. अश्या दर्जेदार एकांकिकांचे प्रयोग होणे गरजेचे असून यातूनच आपल्याला नवीन ऊर्जा मिळणार आहे अशी आयोजक किरण नाकती यांनी आशा व्यक्त केली आहे.कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले तर दीपप्रज्वलन पंढरीनाथ सापकर यांनी केले. परेश दळवी या कट्ट्याच्या कलाकाराने विदुषक हि एकपात्री सादर केली.