पालघर : नॅशनल फिश वर्कर्स फोरम (एनएफएफ) या राष्ट्रीय मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षपदी जेष्ठ नेते नरेंद्र रा. पाटील यांची तर सरचिटणीस म्हणून ज्योती मेहेर यांची निवड तामिळनाडू येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.नॅशनल फिश वर्कर्स फोरम हि संघटना मच्छीमारांचे नेतृत्व करणारी देश पातळीवरील एकमेव संघटना आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील मच्छीमारांबाबतच्या विकासात्मक धोरणे निश्चितीत हि संघटना सहभागी होत असते. देशातील दोन केंद्रशासित प्रदेशासह दहा सागरी राज्यातील संलग्न संघटनांचे लाखो प्रतिनिधी, कार्यकर्ते या संघटनांचे सभासद आहेत. नुकतीच ह्या संघटनेची सर्वसाधारण सभा तामिळनाडू राज्यातील तुतकोरिन येथे पार पडली. सहचिटणिसपदी रविकिरण तोडस्कर, सदस्य म्हणून रामकृष्ण तांडेल, तर संपर्क चिटणीस म्हणून मोरेश्वर वैती यांची निवड करण्यात आली. यावेळी देशातील मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापना करणे, समुद्रावरील मच्छीमारांचे हक्क अबाधित ठेवणे, समुद्रातील नवनवीन प्रकल्प उभारणे आणि विनाशकारी मासेमारी पद्धतीवर बंधी घालणे, मच्छीमारांना डिझेल, रॉकेल सवलती दराने पुरविणे, डिझेल वापरावरील दारिद्र्य रेषेची अट शिथिल करणे, या मागण्यांसाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच येत्या मे महिन्यात ओखा ते कन्याकुमारी ते पश्चिम बंगाल अशा रथ यात्रेचे आयोजन करण्याचे एकमताने ठरविण्यात आले. (वार्ताहर)
नरेंद्र पाटील राष्ट्रीय मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष
By admin | Published: January 09, 2017 5:55 AM