ठाणे : ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपदासाठी आयोजकांच्या अतिउत्साहामुळे ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि पक्षीमित्र उल्हास राणे यांचे नाव जाहीर केले होते. परंतु, हे पद राणे नव्हे तर ज्येष्ठ पक्षिमित्र आणि निसर्ग अभ्यासक दत्ताजी उगावकर भूषविणार असल्याने संमेलनात राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन शनिवार २५ आणि रविवार २६ नोव्हेंबर यादिवशी गडकरी रंगायतन येथे आयोजिले आहे. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मँग्रोव्ह सेल, मुंबई यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. दोन महिन्यांपूर्वी आयोजकांकडून राणे यांचे नाव अध्यक्षपदासाठी जाहीर झाले होते. त्यांनी याआधीही हे पद भूषविले होते. संयोजनातील गोंधळामुळे त्यांचे नाव यंदा देखील जाहीर करण्यात आले. परंतु, आता हे पद राणेंना नव्हे तर उगावकर यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.उगावकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. नाशिकजवळचे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य घोषित व्हावे म्हणून त्यांनी कसोशीने प्रयत्न केले आहेत. त्यांनी १९८७ साली नांदूरमध्यमेश्वरची पक्षी सूची तयार केली. गेल्या पंचवीस वर्षांचा नांदूरमध्यमेश्वरचा डाटा त्यांनी संकलीत केला आहे. किर्लोस्कर वसुंधरा पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे.या वर्षीच्या संमेलनाचे सूत्र ‘नागरी परिसरातील पक्षी आणि त्यांचा जीवनक्रम’ हे आहे. येऊरचे पानगळी अरण्य, खाडीकाठचा किनाºयाचा पाणथळ, दलदलीचा भाग आणि अनेक तलावांमुळे ठाण्याला भौगोलिक विविधता लाभलेली आहे. ठाणे शहर व परिसरात २५० पेक्षा जास्त जातींचे पक्षी आढळतात. ठाण्याची ही पक्षी विविधता या संमेलनामुळे अधोरेखीत होणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या रेट्यात ठाण्याने जरी आपल्या निसर्गाचा काही हिस्सा निश्चितच गमावलेला असला तरिही ठाण्यातल्या विष्णुनगर, भास्कर कॉलनी सारख्या जुन्या भागांपासून ते घोडबंदर रोडवरील नव्या ठाण्यापर्यंत आजही पक्षी दिसतात. केवळ बुलबुल, साळुंकी, कबुतर आणि चिमण्या, पोपट असे कॉमन बर्डसच नव्हे तर पिट्टा (नवरंग), पॅराडाइज फ्लाय कॅचर, ब्राह्मणी घार, पिंगळा, गोल्डन ओरिओल, सी गल्स आणि फ्लेमिंगोज हे सगळे ठाणेकरच आहेत. या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतून अहमदनगर, नाशिक, निफाड, सोलापूर, औरंगाबाद, चिपळूण, रत्नागिरी, दापोली येथून पक्षीमित्र येणार आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने ‘परिसरातील पक्षी आणि त्यांची जीवनशैली’ या सूत्रावरील स्मरणिका तसेच, ‘ठाण्याचे पक्षी वैभव’ हे सचित्र पुस्तक प्रकाशित होणार आहे.
पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष बदलले, दत्ताजी उगावकर यांना मिळणार मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:12 AM