ठाणे : नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक अखेर येत्या २२ नोव्हेंबर रोजी घेण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार, या प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार असले तरीदेखील उथळसर प्रभाग समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपाने मात्र मोर्चेबांधणी केली आहे.सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता तब्बल नऊ महिन्यांनंतर प्रभाग समितीच्या निवडणुका लागल्या आहेत.मागील महिन्यात महासभेत शहरातील प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. १० प्रभाग समित्या एकने कमी करून नऊ करण्यात आल्या. त्यांची निवडणूक आता २२ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता महापालिकेत घेतली जाणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका होणार आहेत.कोपरी, नौपाडा, वागळे, लोकमान्यनगर, सावरकरनगर, वर्तकनगर, माजिवडा, मानपाडा आणि दिवा, शीळ या प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार आहे. तर, कळवा, मुंब्रा या प्रभाग समित्यांमध्ये राष्टÑवादीची बाजी मारणार आहे. उथळसर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे दोन, राष्टÑवादीचे चार आणि भाजपाचे सहा असे संख्याबळ आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्टÑवादी यांची आघाडी झाली, तर भाजपाविरुद्ध शिवसेना, राष्टÑवादी असा सामना येथे रंगण्याची चिन्हे आहेत. त्यातून नवी राजकीय समीकरणे अस्तित्त्वात येतील.
प्रभाग अध्यक्षपद २२ नोव्हेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:47 AM