जितेंद्र कालेकरठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, डोंबिवलीचे रविंद्र वाडेकर आणि ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कामगिरीबद्दल तर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्टÑपतींचे पदक जाहीर झाले आहे. यानिमित्त या अधिक-यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सध्या ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये एसीपी असलेले अवसरे १९८७ मध्ये उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी आतापर्यंत मुंबई शहर, नाशिक ग्रामीण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि ठाणे शहर आदी ठिकाणी उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे. दरोडे, घरफोडया आणि खून अशा अनेक गुन्हयांच्या कौशल्यपूर्ण तपासाबद्दल त्यांना २४० बक्षिसे मिळाली आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे नाशिकच्या कुंभमेळयात ते पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यावेळी या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातच कुंभमेळयाचा परिसर असल्याने त्यांनी कुंभमेळयाची कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे हाताळली होती. सटाण्यातील एका मुलाचे पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. त्यावेळी अवसरे हे वणी या अन्य पोलीस ठाण्यात कार्यरत असतांनाही त्यांनी या मुलाची सुखरुप सुटका केली होती. त्यांच्या याच तपासाबद्दल त्यांना उत्कृष्ठ तपास अधिकारी हा मार्च २००५ चा पोलीस महासंचालकांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल शासनाने दखल घेऊन राष्टÑपती पदक जाहीर केल्याबद्दल गृहखात्यासह वरीष्ठ अधिका-यांचे आभारी असून खूप आनंद झाल्याची प्रतिक्रीया वाडेकर यांनी व्यक्त केली.ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनाही पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेचे राष्टÑपतीपदक जाहीर झाले आहे. ते १९९८ मध्ये उपअधीक्षक म्हणून नागपूर येथे रुजू झाले. नागपूर, पुणे, वसई, ठाणे ग्रामीण आदी शहरामध्ये त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. पुण्याच्या दापोडीतील दारुच्या व्यवसायात गुंतलेल्या एका वसाहतीचे पुनर्वसन करुन त्यांना नविन उद्योगधंदे दिले. तर ठाण्यातील बेकायदेशी दारु निर्मितीच्या धंदयामध्ये गुंतलेल्या ६० जणांचेही त्यांनी पुनर्वसन करुन चौकटीबाहेरचा एक अनोखा उपक्रम यशस्वी केला. २०१० मध्ये त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले असून उत्कृष्ठ कामगिरीचे १०५ प्रशस्तीपत्रकांद्वारे त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
राष्टÑपती पदक म्हणजे सर्व सहकारी टीमचा हा गौरव असून आई वडील, कुटूंबिय यांचेही योगदान त्यात आहे. या पदकाबद्दल विशेष समाधान असल्याची प्रतिक्रीया डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केली.