कल्याण : केडीएमसीतील नगरसेवकांची मुदत ११ नोव्हेंबरला संपत आहे. पण, नगरसेवकांनी सुचवलेली विकासकामे सुरू झालेली नसल्याने विरोधी पक्षनेते राहुल दामले यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यावर नगरसेवक निधीची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पण, आयुक्तांनी महिनाभरापूर्वी आदेश देऊनही कामे सुरू न झाल्याने सोमवारचे आंदोलन अटळ असल्याचा पवित्र दामले यांनी घेतला आहे.
२०१५ मध्ये महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांची मुदत ११ नोव्हेंबरला संपत आहे. त्यास केवळ एक महिना शिल्लक राहिला आहे. यात अर्थसंकल्पाची सभा होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. त्यात मंजूर केलेली विकासकामे अद्याप सुरू झालेली नाहीत. ही कामे करण्याबाबत संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल असे आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले होते. अर्थसंकल्पाची पुस्तिकाही देण्यात आलेली नसल्याकडे दामले यांनी लक्ष वेधले आहे. शुक्रवारी दामले आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी सूर्यवंशी यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. महिनाभरात मुदत संपत आहे. त्यामुळे आंदोलन छेडण्याचा पवित्रा दामले यांनी घेतला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खुलासा करताना नगरसेवक निधीची कामे सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्याचे म्हटले आहे.१४ सप्टेंबरला महापौर, पदाधिकारी, सर्वपक्षीय गटनेते आणि आयुक्त यांच्यात झालेल्या बैठकीचा दाखला देण्यात आला आहे. महापालिकेची उत्पन्नाची बाजू लक्षात घेऊन आणि जमा महसूल विचारात घेऊन तसेच कोविडची सद्य:स्थिती पाहता व त्यामुळे होणारा खर्च पाहता कामांची निकड लक्षात घ्यावी आणि त्यात प्राधान्य ठरवून ती कामे हाती घेण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्याचे नमूद केले आहे. आयुक्तांच्या सूचना आणि आदेश अधिकारी पाळत नाहीत आणि विकासकामांना आडकाठी करतात, याकडे दामले यांनी लक्ष वेधले.