ठाणे : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर व सोशल मीडियावर संघर्ष सुरू असतानाच महापौर नरेश म्हस्के आणि भाजपचे आमदार संजय केळकर यांची सोमवारी महापौर दालनात भेट झाली. उभयतांनी काही काळ चर्चा केली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीवरील दबाव वाढविण्याची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.
खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात म्हस्के यांच्याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर म्हस्के आणि केळकर यांच्यात भेट झाली. यावेळी म्हस्के यांनी केळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, नगरसेवक संदीप लेले, मिलिंद पाटणकर, आदी उपस्थित होते. प्रत्येक महासभेत भाजपविरोधी भूमिकेत दिसून आला आहे. भाजप विरुद्ध महापौर असा सामना ठाणेकरांनी अनेकदा पाहिला आहे. असे असताना अचानक या भेटीमागचे कारण काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. दोघांमध्ये ‘चाय पे चर्चा’ झाली.
मी महापालिकेत आमच्या नगरसेवकांबरोबर चर्चेसाठी गेलो होतो, त्याचवेळेस महापौर म्हस्के हे भाजप गटनेत्याच्या दालनात आले आणि त्यांनी मला भेटण्यासाठी आपल्या दालनात बोलावले. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी त्यांना भेटण्यासाठी गेलो, ही केवळ एक सदिच्छा भेट होती.
- संजय केळकर, आमदार, भाजप, ठाणे शहर
आमचे मैत्रीचे नाते आहे, ते महापालिकेत दिसले होते, त्यानुसार त्यांना चहापानासाठी बोलावले होते. ते सिनिअर आहेत, त्यात कोणत्याही स्वरुपाचे राजकारण नाही.
- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा