आसनगाव : तालुक्यामधील एकमेव शहापूर नगर पंचायतीची निवडणूक १ नोव्हेंबर रोजी होत असून शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा, कॉंग्रेस या सर्व राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अर्थात यावेळी नविन नगर पंचायतीमध्ये कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसून बलाबल त्रिशंकु राहील असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. एकूण १७ प्रभागांसाठी ही निवडणूक होणार आहे.आतापर्यंत राष्ट्रवादीने माजी मंत्री गणेश नाईक यांना स्टार प्रचारक म्हणून आणले तर कॉंग्रेसने माजी खासदार सुरेश टावरे यांना आणले. शिवसेनेने दोनवेळा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शहापुरात पाचारण केले आणि भाजपाने त्यांचे प्रवक्ते मधु चव्हाण यांच्यासह खासदार कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांना प्रचारीत केले. या नेत्यांच्या खांदयावर बंदुका ठेऊन सर्व पक्ष आपल्या परिने लढत असले तरी ही निवडणूक राजकीय चिन्हांपेक्षा उमेदवारांच्या वैयक्तिक संबंधावरच लढविली जाणार आहे. निवडणूकीच्या या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना त्रासदायक ठरणार आहेत. त्या अपक्षांच्या उमेदवाऱ्या, कारण सर्वच पक्षांमधील निष्ठावंत आणि जनाधार असलेले कार्यकर्ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. यामध्ये प्रभाग क्र.१० मधील भाजपाचे मुकुंद जोशी व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय तांबोळी यांनी ऐनवेळी पक्षाचा केलेला त्याग आणि त्यांच्या सौभाग्यवतींनी घेतलेली काँग्रेसची उमेदवारी. युवा सेनेचे कार्यकर्ते प्रियेश जगे यांच्या मातोश्री सौ. प्रगती यांची प्रभाग क्र. ११ मधील उमेदवारी, शिवसेनेच्या आयटी विभागाचे तालुका प्रमुख अनुज अवसरे यांच्या मातोश्री निलम यांची प्रभाग क्र. ८ मधील व शिवसेनेचे अजय भातखंडे यांची प्रभाग क्र. ५ मधील अपक्ष उमेदवारी सगळ्यांनाच त्रासदायक ठरणारी आहे. तसेच सेनेचे हरेष पष्टे यांच्या विरुध्द प्रभाग क्र. ६ मधून उप तालुका प्रमुख राजेशकुमार शिर्के हे अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत आणि या सर्वांची डोकेदुखी त्यांच्या पक्षाला भोगावी लागत आहे. पाहुणे म्हणून आणलेल्या नेत्यांचा करिष्मा शहापुरात जाणवत नसून वैयक्तिक संपर्कावरच ही निवडणूक निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे प्रचार जोरात सुरु असला तरी सगळेच पक्ष नेमके काय घडेल याबाबत धास्तावून गेलेले दिसतात. (वार्ताहर)
शहापुरात राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: October 27, 2015 12:01 AM