भिवंडी : पोलीस असल्याची बतावणी करून दोन महिन्यांपूर्वी ताडाळी परिसरात चोरीची घटना घडली होती. याच परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्धाला रस्त्यात अडवून गळ्यातील सोन्याचे दागिने लुटण्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिदास नारायण भामरे (वय ६२) असे ज्येष्ठाचे नाव असून, ते गुरुवारी सकाळी आपल्या मुलीकडे गेले होते. मुलीकडून घरी परतत असताना ताडाळी स्मशानभूमीजवळील ठाकराचा पाडा पाइपलाईन येथे मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी, तुझे हेल्मेट कुठे आहे, आम्ही विशेष शाखेचे पोलीस आहोत, एवढे सोन्याचे दागिने अंगावर का घातले? असे दरडावत ते काढून डिक्कीत ठेव, पुढे चोरी होऊ शकते, असे सांगत असतानाच दुचाकीवरून आणखी दोघे येऊन या चौघांनी वृद्धाच्या गळ्यातील चेन काढत असल्याचे भासविल्याने भामरे यांनी आपल्या गळ्यातील सोन्याच्या दोन चेन काढून दिल्या. त्या एका कागदात बांधून ठेवत असल्याचे दाखवत हातचलाखीने या चारही चोरट्यांनी भामरे यांच्या गळ्यातील ९० हजार किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला. आपली फसवणूक झाली असल्याचे भामरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.