लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: तुम्हाला मोफत किराणा माल मिळवून देतो, पण तुम्ही गरीब दिसण्यासाठी अंगावरील दागिने काढून आमच्याकडे द्या, अशी बतावणी करीत दोघा भाम्यांनी ६४ वर्षीय वृद्धेकडील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाइल असा ८१ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना सोमवारी घोडबंदर रोड भागात घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.घोडबंदर रोडवरील पातलीपाडा भागात राहणारी ही वृद्ध महिला घरकाम करून आपला उदरनिर्वाह चालविते. ती १४ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास कामावरुन घरी जात होती. त्याच सुमारास घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथील साईश्रद्धा प्राची सोसायटीसमोरील सेवा रस्त्यावर दोन अनोळखींनी त्यांना अडविले. या परिसरात काही दातृत्वान मंडळी मोफत किराणा वाटप करीत आहेत. तुम्हीही आमच्या सोबत चला, तुम्हालाही मोफत किराणा मिळवून देतो, असे सांगून या दोघांनी तिचा विश्वास संपादन केला. पण तुमच्या गळ्यातील सोनसाखळी पाहून लोक तुम्हांला श्रीमंत समजतील. त्यामुळे गरीब दिसण्यासाठी तुम्ही अंगावरील दागिने काढून आमच्याकडे द्या. तेंव्हा ४५ हजारांची सोनसाखळी, ३० हजारांचे कर्णफुले मोबाइल आणि पाच हजारांची रोकड असा ऐवज तिच्याकडून घेऊन त्यांनी एका पिशवीत ठेवण्याचा बहाणा केला. त्यानंतर ही पिशवी घेऊन या दोघांनीही तिथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी या वृद्धेने १७ सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
किराणा मिळवून देण्याची बतावणी करीत ठाण्यात दोघां भामट्यांनी वृद्धेला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 11:40 PM
मोफत किराणा माल मिळवून देतो, अशी बतावणी करीत दोघा भामट्यांनी ६४ वर्षीय वृद्धेकडील सोन्याचे दागिने, रोकड आणि मोबाइल असा ८१ हजारांचा ऐवज लुबाडल्याची घटना घोडबंदर रोड भागात घडली. त्यामुळे मोफत किराणा देण्याच्या नावाखाली कोणी दागिने, पैसे सांभाळून ठेवा, असे सांगत असतील तर वेळीच सावध व्हा, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे.
ठळक मुद्देदोन सोनसाखळ्या आणि मोबाइल केला लंपासकासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा