लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याचे पाळले न जाणारे पथ्य आणि नोकरी, व्यवसायामुळे होणारी दगदग या सगळ्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो आणि अनेक नवे आजार जडतात. विशेषत: शहरी भागात घर, नोकरी, शिक्षण असे सर्वच सांभाळणाऱ्या महिलांना स्वत:कडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ नसतो आणि मग शहरी भागातील सुमारे ४ ते १४ टक्के महिलांना गरोदरावस्थेत मधुमेहाचा त्रास उद्भवतो. याचे दुष्परिणाम बाळाच्या अवयव विकासावरही होतात. त्यामुळे जर गरोदर अवस्थेतील मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर महिलांनी आपल्या खाण्यापिण्याबाबत आणि एकूणच जीवनशैलीत वेळीच संतुलन राखले पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात.
मधुमेहाचा त्रास उद्भवला की अनेक पथ्यं पाळावी लागतात. पण, मधुमेहाचा त्रास होऊ नये म्हणून त्यापूर्वीच काळजी घ्यावी. महिलांमध्ये गरोदरपणात मधुमेहाचा त्रास उद्भवतो. प्रत्येक १०० मागे साधारण ७ गरोदर महिलांना मधुमेह होतो. यामुळे महिलांना आणि त्यांच्या येणाऱ्या बाळाच्या अवयव विकासावर परिणाम होतो. त्यामुळे गरोदरपणात तिच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहणे गरजेचे आहे. काही महिलांची प्रसूतीनंतर रक्तातील साखर पूर्ववत होते. मात्र ते प्रमाण थोडे आहे. त्यातही गरोदरावस्थेत मधुमेहाचा त्रास जाणवण्याचे प्रमाण ग्रामीण भागातील स्त्रियांपेक्षा शहरी स्त्रियांमध्ये अधिक आहे. बदलती जीवनशैली, खानपान यामुळे साधारण ४ ते १४ टक्के शहरी स्त्रियांना हा त्रास या काळात होतो. त्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये खानपानाचे तसेच एकूणच जीवनशैलीत फारसे बदल होत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये गरोदरपणात मधुमेहाचा त्रास होण्याचे प्रमाण २ ते ५ टक्के इतकेच आहे.
------------
महिलांनी गर्भावस्थेच्या सुरुवातीलाच मधुमेहाची चाचणी करावी. जीवनशैली निष्किय असेल तर ती सवय मोडावी. वजन मर्यादित ठेवावे. गर्भावस्थेत किंवा गर्भधारणेपूर्वी कमी शर्करायुक्त आहार घ्यावा. फायबर, प्रथिनेयुक्त आहार घ्यावा. प्रत्येक गोष्टीच्या वेळा ठरवून घ्याव्यात. पुढील धोका ओळखून महिलांनी वेळीच सावध व्हावे.
- शीतल नागरे, आहारतज्ज्ञ