भातसानगर : मुंबई-नाशिक महामार्गावर होणारे अपघात ही मोठी समस्या असून हा महामार्ग दरवर्षी किती बळी घेणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. ११ महिन्यांत ५३ जणांचे बळी गेले आहेत. हे अपघात कमी करण्यासाठी चेरपोली चौकी महामार्ग पोलिसांना आता अत्याधुनिक वाहन मिळाल्याने अपघात कमी होणार आहेत. इंटसेप्टर वाहन पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले आहे.महामार्ग पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या चेरपोली चौकीच्या पोलिसांना हे वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे मद्यपी, बेशिस्त वाहनचालक, अतिवेगाने वाहन चालविणारे, नियम मोडणारे वाहनचालक यांच्यावर महामार्ग पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे.स्पीडगन लेझर तंत्रज्ञानावर आधारित असल्याने समोरून जाणाऱ्या कोणत्याही वाहनाचा ३०० मीटर अंतरापर्यंतचा वेग यामध्ये मोजला जातो.तसेच अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांबाबत पुरावेही पोलिसांना उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन, मद्यपींवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा आहे. या ७१ किलोमीटर अंतरावर कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा नसल्याने हजारो कुटुंबे अपघातांमुळे आज उघड्यावर पडली आहेत. आज जरी आकडा ५३ असला तरी तो केवळ जागेवरील आहे. त्यामुळे तो खूप मोठा आहे. दरदिवशी या रस्त्यांवर अपघात होतात. मात्र, अपघातात जखमी झालेल्यांची कोणतीच काळजी घेतली जात नाही.हे अपघात होऊ नये म्हणून कोणतीही काळजी घेतली जात नसून जखमींवर उपचारासाठी कोणतीच अत्याधुनिक यंत्रणाही नाही. या महामार्गावर पोलीस हवालदार दगडू वाकडे, पुंडलिक भोईर, धनंजय देशमुख, चिंतामण शिंदे, संतोष चव्हाण हे या यंत्रणेद्वारे लक्ष ठेवणार आहेत. याचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास पोलिसांच्यावतीने व्यक्त करण्यात आले आहे.
अपघात रोखण्यासाठी पोलिसांकडे इंटसेप्टर वाहन, ३०० मीटरपर्यंतचा वेग मोजला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:11 AM