लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. पहिल्या लाटेच्या वेळी पालिकेकडे अपुरी आरोग्य यंत्रणा होती. महापालिकेची दोन बडी रुग्णालये आणि १५ नागरी आरोग्य केंद्रे होती. अपुऱ्या आरोग्य यंत्रणेच्या जोरावर कोरोनाला रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कंबर कसली आहे. महापालिका हद्दीत खाजगी कंत्रटदाराच्या माध्यमातून कोरोना सेंटर आणि रुग्णालये उभारण्यात आली आहेत. त्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून पैसा खर्च हाेत आहे. आरोग्यावर महापालिकेच्या इतिहात इतक्या माेठ्या प्रमाणात प्रथमच खर्च केला गेला आहे. वर्षभरात महापालिकेने १३५ कोटींचा खर्च कोरोना रोखण्यावर केला. तर आगामी वर्षात महापालिकेच्या अर्थसंकल्पात किमान ७५ कोटींची तरतूद केली आहे. महापालिकेने कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी निधीची आवश्यकता भासणार यासाठी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ४२७ कोटींची मालमत्ता कराची वसुली केली. त्यासाठी महापालिकेने अभय योजनेची शक्कल लढविली होती. अनावश्यक खर्चाला कात्री लावण्यात आली होती. यंदाही अशाच प्रकारे अनावश्यक खर्च टाळून कोरोना रोखण्यावर भर दिला जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ही भयावह आहे. त्यामुळे पहिल्या लाटेपेक्षा या लाटेला रोखण्यासाठी जास्तीचा खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--------------------
निधीची मागणी
महापालिकेच्या आयुक्तांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडे कोरोना रोखण्यासाठी २१४ कोटींची मागणी केली होती. राज्य सरकारकडे हा प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. पहिल्या लाटेच्या वेळी नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्यातून १७ कोटींचा निधी महापालिकेस कोरोना रोखण्यासाठी दिला होता.
------------------------
कोविड सेंटर वाढवावे लागणार
डोंबिवली क्रीडासंकुल, पाटीदार भवन, जिमखाना, आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली, रुक्मिणी प्लाझा या सहा ठिकाणी महापालिकेची कोविड रुग्णालये आहेत. तसेच टाटा आमंत्र हे मोठे कोविड केअर सेंटर आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका आणखीन कोविड सेंटर व रुग्णालये सुरू करणार आहे. त्यासाठी निधी लागणार आहे. मात्र, तूर्तास महापालिकेच्या निधीतून कोविड सेंटर व रुग्णालये सुरू केली जाणार आहेत.
------------------------
कोट
राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात १७ कोटींचा निधी नगरविकास खात्याकडून प्राप्त झाला होता. आता २१४ कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे. सरकार आपत्कालीन व्यवस्थापन निधीतून काही निधी महापालिकेस देणार असल्याचे सरकारकडून आश्वासित करण्यात आले आहे.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महापालिका.
----------------
चौकट-
एकूण रुग्ण- ९७ हजार ५९२
उपचार घेत असलेले- १६ हजार ४५३
एकूण मृत्यू- १ हजार २९६
कोरोना उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशसनाकडून महापालिकेस प्राप्त झालेला निधी-शून्य.