डोंबिवली - केडीएमसी हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेली बेकायदा बांधकामे तातडीने थांबवा. सीआरझेड आणि बांधकाम निषिद्ध परिसरातही बांधकाम होता कामा नये. त्यानंतरही बांधकाम सुरू असल्याचे आढळल्यास केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना अहवाल दिला जाईल, असा इशारा केडीएमसीचे बेकायदा बांधकामविरोधी विभागाचे अधिकारी सुनील जोशी यांनी प्रभाग अधिकाºयांच्या बैठकीत दिला. रिंग रोडच्या कामाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात अडथळा ठरणाºया बांधकामांवर तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.बेकायदा बांधकामविरोधी विभागाचा जोशी यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी बुधवारी आणि गुरुवारी प्रभाग अधिकाºयांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी वरील इशारा दिला. रिंग रोडच्या आड ६४३ नागरिकांची बांधकामे येत आहेत. त्याबाबतही लवकरच निर्णय घेऊन ती जमीनदोस्त करण्याचे नियोजन वेगाने सुरू असल्याचे जोशी म्हणाले. रस्त्याआड येणाºया रहिवाशांचे पुनर्वसन व अन्य बाबींबाबत आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.एखाद्या प्रभागामध्ये बेकायदा बांधकामांसंदर्भात किती तक्रारी आल्या होत्या, त्यांचे काय झाले? प्रभागनिहाय त्याचाही तपशील तत्काळ द्यावा. त्यावर प्रभाग अधिकारी म्हणून अधिकाºयांनी काय पावले उचलली, त्यानंतर कामे थांबली की नाही, की पूर्ण झाली, याबाबतचीही माहिती मागवल्याचे ते म्हणाले.महापालिकेच्या जागांसंदर्भातही माहिती मागवली आहे. तेथेही अतिक्रमण झाले असल्यास ती हटवली का? ती कायम असल्याने ती पाडण्यासाठी काय करावे लागेल, याचेही नियोजन प्रभाग अधिकाºयांनीच द्यावे. खेळ, उद्याने व अन्य भूखंडांची स्थिती काय आहे, त्या जागांचे टीडीआर दिले आहेत का? ही देखील माहिती मागवल्याचे ते म्हणाले. मालकी हक्काच्या जागेत बांधकाम करताना त्यासाठी महापालिकेची परवानगी घेतली आहे का? घेतली असल्यास कागदपत्रे सादर करावी. परवानगी घेतली नसल्यास अशा बांधकामांवर काय कारवाई केली? असा सवालही त्यांनी प्रभाग अधिकाºयांना केला आहे. बेकायदा बांधकामे उभी राहू नयेत, यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबतही जोशी यांनी मार्गदर्शन केले आहे. जोशी स्वत: प्रत्येक प्रभागात पाहणी करून त्याचा अहवाल आयुक्तांना देणार आहेत.दोन बांधकामे थांबवलीकेडीएमसीचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत म्हणाले, बेकायदा चाळींची बांधकामे तातडीने थांबण्याचे आदेश सुनील जोशी यांनी दिले आहेत.त्यानुसार प्रभागात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांचा शोध घेण्यात येणार आहे. सध्या दोन ठिकाणी कामे सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ती रोखली आहेत. नागरिकांनाही अशी बांधकामे होत असल्याचे आढळल्यास तक्रार द्यावी.
बेकायदा बांधकामे रोखा, प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 2:43 AM