ठाणे : गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी देशातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा विभागाच्या वतीने चौक्या उभारणार असल्याचे विश्व विन्दू परिषदेच्या गोरक्षा विभागाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष गुरूप्रसाद सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या चौक्यांवर असणारे गोरक्षक गायींचे मांस आढळून आल्यास हे गोरक्षक कोणतीही कारवाई करणार नाहीत. मात्र, ही बाब पोलिसांच्या निर्दशनास आणून देतील, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.देशातील अनेक राज्यांमध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही मोठ्याप्रमाणावर गायींच्या मांसाची विक्री आणि तस्करी होते. मात्र, पोलीस त्याकडे डोळे झाक करतात, कायदा असूनही महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी होत नाही, असा आरोप करून कत्तलखान्यांमध्ये डीएनए चाचणी यंत्रणा, टोल नाक्यांवर स्कॅनिंग मशीन बसविण्यात यावेत, अशा मागण्याही यांनी यावेळी केल्या.संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू करावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. गोवंश हत्या बंदीच्या नावावर देशभरात आतापर्यंत झालेल्या हिंसाच्या घटनेत आमच्या कार्यकर्त्यांचा समावेश नव्हता, जे गोवंश हत्याबंदीच्या नावावर आपली दुकाने चालवित होते किंवा आहेत त्यांचा आमच्या संघटनांशी संबंध नसल्याचा दावाही त्यांनी केला. भारतात गायींच्या ४१ प्रजाती आहेत. त्यातील काही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आल्याने आपण जागे झाले आहोत, असे ते म्हणाले. यावेळी परिषदेच्या कोकण प्रांतांचे लक्ष्मीनारायण चांडक, राजेंद्र पाटील उपस्थितीत होते.
आपल्या देशातील कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पुर्वी गायींवरच अंवलबून होती, आपल्याकडच्या गायी या देशातील सर्व प्रकारच्या तापमानात वास्तव्य करू शकतात, आपल्या प्रजातींच्या गायींच्या दुधांच्या सेवनामुळे प्रतिकार शक्तीत वाढ होते, हे सिध्द झाले आहे. त्याचबरोबर गायीचे शेण आणि गोमूत्र हे देखील औषधी आहे, या दोन्हींचा वापर करून त्यावर औषधेही तयार केली आहेत, ही औषधे गुणकारी असल्याचे सिध्द झाल्याने या औषधांना मागणी वाढत असल्याचा दावा सिंह यांनी केला. मात्र आपल्या देशात गायींची महती आणि त्यांचा उपयोग आपण विसरत गेल्याने आपल्याकडे शेणखता ऐवजी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर वाढल्याने आपण रोज अन्नातून विषच सेवन करत आहोत, आपण सेवन करत असलेल्या अन्नातून आपल्याला पोटात आपण एकप्रकारे विषच सेवन करत आहोत, हे सगळे आपण गायींकडे दुर्लक्ष करत असल्याने घडत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले