कल्याण : विकास योजनांमधील समाविष्ट असलेल्या रस्त्यांवर यापुढे अतिक्रमणे होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आदेश कल्याण-डोंबिवली मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळ व मनपा अधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी आयुक्तांची एक बैठक झाली. या वेळी त्यांनी वरील आदेश दिले. दुर्गाडी ते सहजानंद चौक, दुर्गाडी ते पत्रीपूल या रस्त्यावरील बहुतांश दुभाजक तुटले असून, ते प्राधान्याने दुरुस्त करावेत, अशा सूचना त्यांनी महामंडळाला दिल्या.
दरवर्षी पावसाळ्यात शिवाजी चौकात पाणी तुंबते. त्यावर तोडगा काढण्यासाठी जल, मल, मोबाइल कंपन्यांच्या सेवा वाहिन्या शिफ्ट केल्या पाहिजेत. महापालिकेने त्याचा अभ्यास करावा. रस्ता रुंदीकरणाची निविदा प्रक्रिया राबवावी. रस्ता रुंदीकरण करताना तेथे क्रॉस ड्रेन तयार करून पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या वेळी दिली. भटाळे तलावातील प्रस्तावित विकास योजना रस्ता तसेच इतर आरक्षणाखाली अतिक्रमणे काढण्याचे निर्देश मनपा उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना मनपा आयुक्तांनी दिले आहेत. बाधित अतिक्रमणांमध्ये पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी पुनवर्सन समितीपुढे तातडीने सादर करावा, असेही आयुक्तांनी या बैठकीत आदेशित केले आहे.
-------------------------