लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गणेशोत्सवात फुलांना अधिक मागणी असल्याने फुलांचे दर चढे असतात. यंदा मात्र फुलांचे दर अव्वाच्या सव्वा वाढल्याने फुले महागली आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेल्या गणेशभक्तांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. फुलांची आवक घटल्याने दर आणखी वाढले आहेत. फुलांमध्ये मोगरा, गुलछडी भाव खात आहे.
शुक्रवारी बाप्पांचे आगमन होत असल्याने गुरुवारी गणेशभक्तांनी शेवटची खरेदी फुलांची केली. फुले लवकर खराब होत असल्याने गुरुवारी फूल मार्केटमध्ये गर्दी होती. मात्र फुलांचे गगनाला भिडलेले दर ऐकून ग्राहक अवाक् झाले. अर्थात कुठल्याही धार्मिक कार्यात फुलांचे महत्त्व असल्याने फुलांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पुणे, नाशिक, सातारा, सांगली, जुन्नर येथून फुलांची आवक ठाणे शहरात झाली आहे. यंदा झालेल्या प्रचंड पावसामुळे फुलांच्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे जिथे २० गाड्या येत होत्या, तिथे दहाच गाड्या येत आहेत, असे फूल विक्रेते सोपान काळे यांनी सांगितले.
फुलांचे दर खालीलप्रमाणे
कलकत्ता झेंडू : ८० ते १५० रु. किलो
पिवळा झेंडू : १५० ते २०० रु. किलो
गुलछडी : १००० रु. किलो
मोगरा : ३००० रु. किलो
लिली : १००० रु. शेकडा
चाफा : १००० रु. शेकडा
जास्वंद : ५०० रु. शेकडा
जाई, जुई : २००० रु. किलो
गुलाब : १०० ते १५० रु. बंडल
हार : २० रु. ते ५०० रु.
कनेर : १००० रु. किलो
टगर : २००० रु. किलो
शेवंती : ३०० रु. किलो
दूर्वा : ३० रु. जुडी
तुळस : १०० रु. जुडी
शमी पत्र : २० रु. जुडी
..............